News Flash

मागणी घटल्याने कांदादर कोसळला

शहरांतील स्थलांतर, हॉटेल्स बंदचा परिणाम; शेतकरी हवालदिल

शहरांतील स्थलांतर, हॉटेल्स बंदचा परिणाम; शेतकरी हवालदिल

ठाणे, नाशिक : टाळेबंदीत शिथिलता येऊनही हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्यावर असलेले निर्बंध, करोनाच्या भीतीने शहरांतून परराज्यात झालेले प्रचंड स्थलांतर, वडापाव-पावभाजी यांसारख्या खाद्यपदार्थाची बंद झालेली विक्री आणि या तुलनेत अधिक असलेली मालाची उपलब्धता यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या घाऊक बाजारपेठेत कांदा आणि बटाटय़ाचे दर निम्म्याहून कोसळले आहेत.

कांद्याच्या आशिया खंडातील सर्वात मोठय़ा लासलगाव बाजार समितीत जून महिन्यात कांद्याचे सरासरी दर ७५० रुपयांच्या आसपास राहिले. शुक्रवारी १५ हजार क्विंटलची आवक झाली. त्यास किमान ४०१ तर कमाल ११४२ आणि सरासरी ७८० रुपये दर मिळाले.

करोनापूर्व काळात मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात दररोज किमान १०० ते १२० गाडी इतका कांदा लागत असे. बटाटय़ाची मागणीही ६० ते ७० गाडी इतकी असे. नाशिक जिल्ह्यातून आवक होण्याचे हे प्रमाण कायम राहिले तर मुंबईत कांदा, बटाटय़ाचे दर वाढत नाहीत असा यापुर्वीचा अनुभव आहे. महानगर क्षेत्रातील हॉटेल, रेस्टॉरंट चालक किमान ४० ते ५० गाडी कांदा खरेदी करीत. आता ही रोजची खरेदी थंडावली आहे. दिवसाला कांद्याने भरलेल्या जेमतेम ३० गाडय़ा या बाजारात येत असून त्यानंतरही दर घटले आहेत, अशी माहिती कांदा-बटाटा आडत महासंघाचे पदाधिकारी चंद्रकांत रामाणे यांनी दिली.

स्थिती काय?

’ वाशी येथील घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा कांदा किलोमागे पाच ते आठ रुपयांनी तर बटाटा १३ ते १८ रुपयांनी विक्री होत आहे.

’ या बाजारात मागणी घटल्याने जेमतेम ३० ते ४० गाडय़ा इतकीच मालाची आवक होत आहे. तरीही दर कोसळल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत.

’ किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा कांदा किलोमागे १२ ते १५ रुपयांनी तर बटाटा २० ते २५ रुपयांनी विकला जात आहे.

शेतकऱ्यांची मागणी..

कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटल ९०० रुपयांच्या आसपास आहे. सध्याच्या दरात उत्पादन खर्च भरून निघत नाही. त्यामुळे किमान दोन हजार रुपये दर मिळावेत, अशी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी आहे. त्यासाठी मध्यंतरी संघटनेने पंतप्रधानांना पत्र पाठविण्याचे आंदोलन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 5:22 am

Web Title: onion prices fell due to declining in demand zws 70
Next Stories
1 कोविड रुग्णालयाच्या पाहणीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर अनेक उणिवा उघड
2 काशिद समुद्र किनाऱ्यावर भयाण शांतता
3 वादळग्रस्तांच्या मदतीसाठी तीन जिल्ह्य़ांकरिता ३६० कोटी मंजूर
Just Now!
X