गेल्या पंधरवडय़ात कांद्याचे दर सुमारे ५७८ रुपयांनी वाढले असून सध्या घाऊक बाजारात सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटलवर जाऊन पोहोचले आहेत. साठविलेला उन्हाळ कांदा संपुष्टात येत असल्याने त्याची आवक कमी होत आहे. त्यातच, पावसाच्या ओढीमुळे नवीन कांदाही बाजारात नेहमीप्रमाणे वेळेवर येण्याची चिन्हे नाहीत. दुसरीकडे, अतिवृष्टीमुळे देशांतर्गत इतर ठिकाणीही कांद्याचे नुकसान झाले आहे. परिणामी, पुढील काळात कांदा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार असल्याचे दिसत आहे.
बाजारात सध्या साठविलेला उन्हाळी कांदा येत आहे. उन्हाळ्यामध्ये जिल्ह्य़ात अनेकवेळा पाऊस झाल्याने त्याचा फटका कांद्याला बसून उत्पादन कमी झाले. शिवाय, हाती आलेल्या कांद्याचा टिकावूपणाही कमी झाला आहे. सध्या पावसाळी वातावरणात तो निकृष्ट होण्याची शक्यता असल्याने शिल्लक राहिलेला माल बाजारात आणण्याकडे कल आहे. पण, त्याची आवकही कमी असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. खरीपात कांद्याची वेळेवर लागवड झाली नाही. यामुळे तो कांदा नेहमीपेक्षा विलंबाने म्हणजे नोव्हेंबरपर्यंत येईल, असा अंदाज तज्ज्ञ चांगदेवराव होळकर यांनी व्यक्त केला.
कांद्याची आयात करणार
नवी दिल्ली :  राजधानीत कांद्याचे भाव प्रतिकिलो ४० रुपयांवर गेल्याने सरकारने पाकिस्तान, चीन आणि इजिप्तमधून १० हजार टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सध्या २८ लाख टन रब्बी कांद्याचा साठा असून तो देशाच्या दोन महिन्यांच्या मागणीइतका आहे.
कांद्याची सर्वात मोठी
बाजारपेठ अशी ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीत सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त लिलाव बंद होते. बाजार बंद होण्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ८७४० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यास सरासरी २५०० रुपये भाव मिळाला. या भावाची जुलैच्या प्रारंभी असणाऱ्या भावाशी तुलना केल्यास ५७८ रुपयांनी वाढ झाली आहे.