कांद्याचे भाव  रविवारी पुन्हा कडाडले असून पाच हजार रूपयांच्या पुढे दराने उसळी मारली आहे. हे दर लवकरच ८० रूपयांवर पोचणार असून खुल्या बाजारात कांदा १०० रूपयांच्या पुढे विकला जाईल असे तज्ञांचे म्हणणे आहे.राहुरीच्या बाजार समितीत आज कांद्याचे लिलाव झाले. प्रति िक्वटल तीन हजार ६०० ते पाच हजार १०३ रूपये दर निघाला. मागील वर्षी आजच्या तारखेला दोन हजार रूपये िक्वटल दर होता. आज पाच हजार गोण्यांची आवक होती. तर मागील वर्षी आजच्या तारखेला ५० हजार गोणी कांद्याची आवक होती. मागील वर्षांच्या पेक्षा नऊ पटींनी आवक कमी असून भाव दुप्पट आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे लाल कांद्याची आवक सुरू झालेली नाही. आता रांगडय़ा कांद्याची आवक तब्बल तीन महिन्यानंतर येईल. दुष्काळी परिस्थिती कायम राहिली तर मात्र कांद्याचे दर हे कडाडतील. आंध्र व कर्नाटकात कांदा नाही. गुजरात, मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये पुराने कांदा सडला आहे. चाळीत २० टक्के कांदा आहे. त्यामुळे सरकारने कितीही उपाययोजना केली तरी दर चढेच राहतील.आंध्र प्रदेश सरकारने खुल्या बाजारात कांदा खरेदी सुरू केली असून २५ रूपये दराने विक्री केली जात आहे. दिल्लीतही असेच धोरण आहे. भाजपशासित  मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये कांदा व्यापाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. मात्र याचा फ़ारसा परिणाम होणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.