अशोक तुपे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-पुण्यात ग्राहकांना महागडय़ा दराने कांदा खरेदी करावा लागत असतानाच शेतकऱ्यांपुढे कांदा विकायचा तरी कुठे, असा जटिल प्रश्न निर्माण झाला आहे. कांद्याचे दर कोसळले असून प्रति क्विंटल ६०० ते ८०० रुपयांवर आले आहेत.  शेतमाल विक्रीची साखळीच खंडीत झाल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नगर, सोलापूर, पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांमध्ये उन्हाळी कांदा मोठय़ा प्रमाणात पिकविला जातो. सध्या या कांद्याच्या काढणीचे काम सुरू आहे. काढणीकरिता तसेच जमिनीच्या मशागतीसाठी मोठा खर्च येतो. हा खर्च केल्यानंतर हाती आलेला कांदा विकायचा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पुणे, नगर, सोलापूर या बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये गुरुवारी कांद्याचे लिलाव करण्यात आले. मात्र, देशांतर्गत आणि निर्यातीसाठी मागणी नसल्याने भाव ६५० ते ८५० रुपयांपर्यंत आले. आता टाळेबंदीनंतर कांद्याचे लिलाव सुरू झाल्यास आवक प्रचंड वाढणार आहे, असे कांदा व्यापारी सुदाम तागड व सुरेश बाफना यांची सांगितले.

कांदा विक्रीची साखळी ही गेल्या एक महिन्यापासून खंडीत झाली आहे. सुरुवातीला निर्यात बंद होती. परवानगीचा निर्णय झाल्यानंतर १५ दिवसांनी निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली. टाळेबंदीमुळे निर्यातही कमी प्रमाणात सुरूआहे. श्रीलंका, बांगलादेश, दुबई तसेच आखाती देशात कांद्याला मागणी आहे. पण, जहाज उपलब्ध होण्यास वेळ जातो. कांद्याच्या मोटारी भरण्यास मजूर मिळत नाहीत. माल वाहतूक कंपन्यांचे कामकाज बंद आहे. त्यांना एका बाजूने माल घेऊन गेले तर दुसऱ्या बाजूने येताना माल मिळत नाही. रिकाम्या मोटारी घेऊन परत यावे लागते. मालवाहक मोटारी उपलब्ध झाल्या असल्या तरी त्यांनी दुपटीने भाडे वाढविले आहे. पूर्वी चेन्नईसाठी दहा टनाच्या मालमोटारीचे २५ हजार रुपये भाडे होते. ते आता ५० हजार रुपये झाले आहे. पूर्वी कांदा वाहतुकीचा खर्च किलोला ३ रुपये होता. तो आता ८ रुपयांवर गेला आहे. कांदा वाहनात भरण्याचा आणि तो उतरविण्याचा खर्चही वाढला आहे.

उत्पादन प्रचंड

एका बाजूला कांदा विक्रीची साखळी बाधीत झाली असतानाच यंदा उत्पादन प्रचंड आहे. देशात २५ लाख टन कांद्याचे उत्त्पादन जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा रब्बी कांद्याची लागवड ४ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रात झाली. मागील वर्षीपेक्षा सुमारे पावणेदोन लाख हेक्टर हे क्षेत्र जास्त आहे. पण काही भागात मात्र कांद्याचे प्रतिहेक्टरी उत्पादन घटले आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन नेमके किती होणार याचा अंदाज येण्यास आणखी दोन महिन्याच्या कालावधी लागणार आहे.

किरकोळ विक्रेत्यांअभावी अडचण

वाशी बाजार समितीमधील कांदा निर्यातदार व्यापारी जय चव्हाण यांनी सांगितले की, वाशी बाजारात दररोज ४० ते ५० गाडय़ा कांदा दररोज विकला जातो. परंतु आता केवळ पंधरा ते वीस गाडय़ा कांदा विकला जात आहे. मुंबईतील किरकोळ विक्रेते गावाकडे निघून गेले आहेत. टाळेबंदीमुळे त्यांना मुंबईत येता येत नाही. ग्राहकांना गरज असूनही कांदा मिळत नाही. त्यांना ३० ते ४० रुपये किलोने कांदा घ्यावा लागतो. शेतकऱ्यांना आठ रुपये दर पडतो. ही तफावत टाळेबंदीमुळे वाढली आहे.

निर्यातही निम्म्यावर :  कांदा निर्यात सुरू असली तरी अनेक देशांत करोनाचे रुग्ण वाढले आहेत. निर्यात केलेल्या कांद्याचे पैसे मिळतील की नाही याची शक्यता नाही. पंधरा दिवसांनी माल मिळाल्यानंतर परदेशातील व्यापारी पैसे पाठवितात. पण आता निर्यातदाराची भूमिका सावधपणाची आहे. कांद्याची तसेच जहाजावरील लोकाची आरोग्य तपासणी केली जाते. कांदाही तपासला जातो. विविध परवाने मिळाल्यानंतर कांदा निर्यात होतो. पूर्वीपेक्षा जास्त पैसे निर्यात करतांना खर्च केले जातात. त्यामुळे निर्यातीत निम्म्याने घट झाली आहे.

खप निम्म्यावर कशामुळे?

राज्यातील नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधून उत्तर भारतात तर नगर, सोलापूर व सातारा येथील बाजार समित्यातून दक्षिण भारतात कांदा जातो. पुणे जिल्ह्यातील कांदा हा पुणे, मुंबई शहरात जातो. दररोज दहा टनाच्या दोन हजार मालमोटारी भरून कांदा विकला जातो. शिवारातच शेतकऱ्यांच्या थेट शेतात परप्रांतातील व्यापारी कांदा खरेदी करतात. सुमारे एक हजार मालमोटारी या किमान दोन महिने शिवारातच भरल्या जातात. पण ते सारे आता ठप्प आहे. -भाजीमंडई, आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. रस्त्याच्याकडेला बसणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. केवळ हातगाडय़ांवर भाजीपाला विकू दिला जातो. मोठय़ा शहरातील हॉटेल बंद आहेत. लोकांना बाहेर पडता येत नसल्याने कांदा खरेदी करता येत नाही. त्यामुळे कांद्याचा खप हा निम्म्यापेक्षाही अधिक कमी झाला आहे.

कांदा निर्यातदारांना विविध परवाने घ्यावे लागतात. टाळेबंदीमुळे निर्यातदारांपुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या. केंद्र सरकारच्या कार्यालयातील काही अधिकारी हे घरी निघून गेले होते. त्यांना शोधून काढले. निर्यातदारांना विविध परवाने मिळवून दिले. त्यामुळे आता निर्यात सुरू झाली आहे. पणन मंडळ निर्यातदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. – सुनील पवार, व्यवस्थापक, पणन मंडळ

परदेशात कांद्याला मागणी आहे. पण सध्या टाळेबंदीमुळे निर्यात कमी प्रमाणात सुरू आहे. टाळेबंदीनंतर निर्यातीला चालना मिळेल. यंदा उत्पादन अधिक आहे. त्यामुळे कांदा निर्यात मोठय़ा प्रमाणात होण्यासाठी काही उपाययोजना सरकारने केल्या पाहिजेत. जहाज अधिक प्रमाणात उपलब्ध करावे. टाळेबंदीनंतर वाहतुकीची समस्या सुटेल.  -नितीन जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion scales but for consumers prices will go up abn
First published on: 10-04-2020 at 00:28 IST