पावसाने सुरुवातीला ओढ दिल्यामुळे नवीन कांद्याचे उत्पादन लांबणीवर पडले आहे. तसेच दक्षिणेकडील राज्यातून महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढल्यामुळे गेल्या पंधरवडय़ापासून कांद्याच्या दरात वाढ होत असून शुक्रवारी किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचा दर ५० ते ७० रुपये असा झाला. नवीन कांद्याची आवक नोव्हेंबरमध्ये सुरू होणार असल्याने पुढील दोन महिने कांद्याचे दर तेजीतच राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यंदाच्या हंगामात पहिल्या टप्यात पावसाने ओढ दिल्याने कांदा उत्पादक शेतक ऱ्यांचे नुकसान झाले. कांद्याची रोपे जळाली. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. त्यानंतर पावसाने जोर धरला आणि पुन्हा नवीन लागवड करण्यात आली. कांदा उत्पादक शेतक ऱ्यांनी कांद्याची लागवड केली असली तरी नवीन उत्पादन बाजारात येण्यास आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. नोव्हेंबरनंतर बाजारात नवीन कांद्याची आवक सुरू होईल, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कांदा व्यापारी विलास रायकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. दक्षिणेकडील कांद्याच्या उत्पादनावरही परिणाम झाला असून दक्षिणेकडील राज्यातून महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक अपुरी पडत आहे. मागणी वाढल्याने कांद्याच्या भावात टप्याटप्याने वाढ सुरू आहे. पुणे, नाशिक, नगर येथील घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून कांद्याला मागणी वाढली आहे. नाशिक येथील बाजारात गुरुवारी प्रतिक्विंटल कांद्याचा दर साडेचार ते पाच हजार रुपये असा होता. घाऊक बाजारात कांद्याच्या दरात वाढ होत असल्याने किरकोळ बाजारात कांद्याची विक्री सध्या ५० रुपये प्रतिकिलो या दराने केली जात आहे, असेही रायकर यांनी सांगितले.  गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी मार्केटयार्डातील बाजारात कांद्याची आवक थोडी वाढली. बाजारात १०० गाडय़ांमधून कांदा विक्रीसाठी पाठविण्यात आला. घाऊक बाजारात शुक्रवारी एक किलो कांद्याचा दर ४० ते ४५ रुपये असा राहिला.