मराठवाडय़ातून बंगळुरू, हैदराबाद, नाशिक व कोल्हापूर येथील बाजारपेठांमध्ये दरवर्षी कांदा पुरविणाऱ्या उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यांतील कांद्याचे कोठार यंदा पावसाअभावी ओसाड पडले. हजार टनापर्यंत निघणारे कांदा उत्पादन घटल्याने कांद्याला सध्या सोन्याचा भाव येऊनही त्याचे उत्पादन घेता न आल्याने तब्बल सहा कोटींच्या उत्पन्नावर पाणी फेरले.
तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा, काक्रंबा, सिंदफळ, कामठा, ढेकरी, उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि.), कौंडगाव, पाडोळी, केशेगाव परिसर कांद्याचे कोठार म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकरी नगदी पीक म्हणूनच कांद्याकडे पाहतात. यंदा दुष्काळी स्थिती, पाण्याचे स्त्रोत आटल्याने आपसिंगा, ढेकरी, काक्रंबा, सिंदफळ येथील शेतकऱ्यांनी महागडे रोप-बियाणे घेऊन ठेवले. परंतु पावसाअभावी कांद्याचे रोप तयार केले नाही. काक्रंबा येथील शेतकरी कांद्याचे रोप तयार करून विकतात. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. यंदा हा व्यवहार ठप्प आहे. सध्या कांद्याला किमान ६० रुपये, तर कमाल ८० रुपये किलो दर मिळत आहे. गतवर्षी कांद्याला १० ते १५ रुपये प्रतिकिलो दर होता. मागील हंगामात कांद्याच्या कोठारातून शेतकरी एकरी १० टन कांदा उत्पादन घेत होता. त्यावेळी एक ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळत होते. यंदा कांद्याला चांगला भाव मिळत आहे. यंदा पाऊस झाला असता तर शेतकऱ्यांना एकरी ५-६ लाखांचे उत्पन्न मिळाले असते. परंतु यंदा पाऊस नसल्याने ना रोपे, ना लागवड, ना उत्पन्न मिळाले. एकंदरीत कांदा उत्पादकांना मोठा आíथक फटका बसला आहे.
‘शेताकडे बघू वाटेना’
आम्हाला सहा एकर माळरान आहे. एक बोअर घेऊन शेतातून चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारे कांद्याचे पीक दरवर्षी घेतो. दोन वर्षांपासून पाऊसच नसल्याने बोअरचे पाणी कमी झाले. यंदाही पाऊस नाही. त्यामुळे कांदा लागवड केली नाही. त्यामुळे गेल्या वर्षी जेवढे उत्पन्न मिळाले, त्यापेक्षा यंदा अधिक उत्पन्न मिळेल अशी आशा होती. परंतु पाऊसच नसल्याने कांद्याना सोन्याचा भाव येऊनही काहीच करू शकत नाही. शेत ओसाड पडल्याने त्याकडे बघू वाटत नाही, अशी प्रतिक्रिया सिंदफळ येथील कांदा उत्पादक शेतकरी पांडुरंग क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
दुष्काळाने आशेवर पाणी फिरवले
कांद्याला बाजारात ६० ते ८० रुपये भाव मिळत आहे. परंतु आमच्याकडे कांदा नाही. गेल्या वर्षी जेवढे उत्पन्न मिळत होते, त्यापेक्षाा चौपट उत्पन्न या वर्षी मिळाले असते. परंतु पाऊसच नसल्याने यंदा एकरी साडेचार लाख रूपये उत्पन्नाच्या आशेवर पाणी फेरले आहे, असे केशेगाव येथील शेतकरी लक्ष्मण लांडगे यांनी सांगितले.