३१ डिसेंबपर्यंत विकलेल्या कांद्याला अनुदान मिळणार

सोलापूर : राज्यात पार कोसळलेल्या कांदा दरामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून कांदा अनुदानाची मुदत १५ डिसेंबरऐवजी ३१ डिसेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचा लाभ ३१ डिसेंबपर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतक ऱ्यांना मिळणार आहे. यासंदर्भात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलेल्या विनंतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्यता दिली आहे. ही माहिती स्वत: सहकारमंत्री देशमुख यांनी दिली.

राज्यात कांद्याचे दर प्रचंड प्रमाणात कोसळल्याने शेतकरी धास्तावला आहे. कांदा उत्पादनाचा खर्च राहिला बाजूला, उत्पादित झालेला कांदा जवळच्या कृषिउत्पन्न बाजार समितीपर्यंत आणण्यासाठी होणारा वाहतूक खर्चदेखील निघत नाही, इतका दर घसरला आहे. ही स्थिती गेल्या दोन महिन्यापासून कायम आहे. यात शासनाची भूमिका दिलासा देणारी नसल्याने कांदा उत्पादक शेतकरीवर्गात तेवढीच नाराजी व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर अखेर शासनाने कांद्याला दर क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या कांदा अनुदानाची मुदत १ डिसेंबर ते १५ डिसेंबपर्यंत होती. या कालावधीत जो कांदा कृषिउत्पन्न बाजार समितीत आला, त्या कांद्याला शासनाकडून अनुदान मिळणार आहे. परंतु हा कालावधी फारच अपुरा असल्यामुळे त्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे शासननियुक्त संचालक शहाजी पवार यांनी यासंदर्भात सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे आग्रह धरला होता.

त्यानुसार अखेर कांदा अनुदानाला पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सहकारमंत्री देशमुख यांनी यासंदर्भात सोलापुरातून मुख्यमंत्री फडणवीस यांना एसएमएस करून कांदा अनुदानाला ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लगेचच एसएमएसद्वारेच प्रत्युत्तर देत कांदा अनुदानाला ३१ डिसेंबरअखेपर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता दिल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले.