कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी संतप्त शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली कळवण तालुक्यातील कोल्हापूर फाटा येथे प्रशासकीय कार्यालयावर कांदा फेक केली. जिल्ह्य़ात ठिकठिकाणच्या तहसीलदार कार्यालयांवर कांदा फेक आंदोलन करत त्यास अडीच हजार रुपये हमी भाव देण्याची मागणी करण्यात आली.

आडत बंदीचा निर्णय झाल्यापासून शासन व व्यापारी यांच्या वादात शेतकरी भरडला गेला आहे. त्या वेळी महिनाभर बाजार समित्यांचे काम बंद राहिले. परिणामी, कांदा खराब झाला. त्याचे वजनही कमी झाले. सद्य:स्थितीत घाऊक बाजारात तो प्रति क्विंटलला सरासरी ५०० रुपये भाव आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. कळवण बाजार समितीत त्यास पाच रुपये किलो भाव मिळाला. यामुळे संतप्त शेतकरी राष्ट्रवादीच्या आंदोलनात सहभागी झाले. मानूरच्या प्रशासकीय इमारतीसमोर कांदे फेकण्यात आले. मंगळवारी सायखेडा उपबाजारात कांद्याला क्विंटलला पाच रुपये म्हणजे पाच पैसे किलो असा भाव मिळाला होता. मागील चार महिन्यांपासून भाव गडगडत असल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे.

आत्महत्येचे प्रमाणही वाढत असून शासनाने हस्तक्षेप करून कांद्याला अडीच हजार रुपये भाव जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीने तहसीलदार कार्यालयात कांदा फेक आंदोलन केले.