केंद्र सरकारने कांदा आयातीचा निर्णय जाहीर केल्याचे पडसाद मंगळवारी येथील घाऊक बाजारपेठेत उमटले. कांद्याच्या सरासरी भावाने ९०० रुपयांनी उसळी घेत प्रती क्विंटल ३४०० रुपये इतका चढा दर कांद्याने घेतला. तीन दिवसाच्या सुटीनंतर सुरू झालेल्या जिल्ह्य़ातील बाजार समित्यांमध्ये कांदा भावाने हंगामातील उच्चांकी पातळी गाठली. दुसरीकडे किरकोळ बाजारातील किंमती कमी करण्यासाठी केंद्राने नाफेड व अन्य संस्थेमार्फत खरेदी केलेला कांदा बाजारात आणण्याची तयारी सुरू केली आहे.
देशांतर्गत बाजारात कांद्याचे प्रती किलोचे भाव ४० रुपयांच्या घरात पोहोचल्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तान, चीन आणि इजिप्तमधून १० हजार टन कांदा खरेदी करण्याचे सोमवारी जाहीर केले. त्याचा उलटा परिणाम स्थानिक पातळीवर झाला. देशांतर्गत घाऊक बाजारात भाव कमी होण्याऐवजी त्यात लक्षणीय वाढ झाली.
जिल्ह्य़ातील इतर बाजार समित्यांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. मनमाड बाजार समितीत कांदा भावाने क्विंटल मागे एक हजार रुपयांनी उसळी घेतल्याने व्यापारी व अडते यांची तारांबळ उडाली. महिनाभरात भावात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने दरवाढ होत असल्याचे व्यापारी शंकर नागरे यांनी सांगितले. दरम्यान, मध्यंतरी केंद्र सरकारने नाफेड व अन्य एका संस्थेमार्फत घाऊक बाजारातुन कांदा खरेदी केली आहे. हा राखीव साठा १० हजार टन असून तो बाजारात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा राखीव साठा टप्प्याटप्प्याने बाजारात आणून भावावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

कांद्याची दरझेप!
’लासलगाव बाजार समितीत मंगळवारी १०,८०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रती क्विंटलला सरासरी ३४०० रुपये भाव मिळाल्याचे सभापती नानासाहेब पाटील यांनी सांगितले.
’बाजार बंद होण्याच्या दिवशी म्हणजे गेल्या शुक्रवारी हाच दर २५०० रुपये होता. सकाळी लिलाव सुरू झाल्यानंतर भाव ३७०० रुपयांहून अधिकवर झेपावले.
’यामुळे बाजारात आवक वाढू लागली आणि दुपारनंतर सरासरी दर ३४०० रुपयांवर आल्याचे पाटील यांनी सांगितले.