गोंडवाना विद्यापीठाकडून करोनाचे संकट लक्षात घेता विद्यार्थ्यांना महाविद्यालयापर्यंत न बोलवता घर बसल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाशी संलग्न ६० टक्के महाविद्यालयांनी देखील ऑनलाइन प्रवेशाची व्यवस्था केली आहे.

गडचिरोली व चंद्रपूर या जुळ्या जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेत एकूण ३६ हजार ६९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरवर्षी यातील बहुसंख्य विद्यार्थी विविध अभ्यासक्रमासाठी मुंबई, पुणे, नागपूर, हैद्राबाद, बंगलोर, अमरावती अशा मोठ्या शहरांमध्ये जात होते. मात्र, यावर्षी करोनाचे संकट लक्षात घेता बहुतांश विद्यार्थी याच जिल्ह्यात मुक्कामी राहण्याचा अंदाज आहे. त्यानुसार विविध अभियांत्रिकी, व्यवस्थापन तथा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. करोनाचे संकट लक्षात घेता गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थ्यांना महाविद्यालयापर्यंत न येऊ देता थेट ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून राबवण्यात येणार आहे.

त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी घर बसल्या आवडत्या विद्याशाखेत प्रवेश घ्यावा असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून तयारी करून ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ६० टक्के महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रवेशाची तयारी पूर्ण केली असल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिल चिताडे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.

या ऑनलाइन प्रवेशामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश अर्ज, कागदपत्रे तथा प्रवेश शुल्क सर्व काही ऑनलाइनच भरायचे असल्याची असल्याचे डॉ. चिताडे यांनी सांगितले. १ ऑगस्टपासून सुरू होऊन साधारणत: ३० ऑगस्टपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया राहणार आहे. त्यानंतर कुलगुरूंच्या निर्देशाव्दारे प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात येईल. गोंडवाना विद्यापीठाकडून आठ ते दहा दिवसांत प्रथम आणि व्दितीय वर्षाचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांच्याही प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याची माहिती डॉ. चिताडे यांनी दिली.