ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. कधी एटीएम कार्डचा पीन क्रमांक विचारुन, तर कधी बँक खाते हॅक करुन गंडा घातला जातो. मात्र अहमदनगर जिल्ह्यात तर आता थेट भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांच्या नावांचा वापर करुन लुबाडण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.

कशी केली जाते फसवणुक

हॉटेल चालकाला मी भारतीय सैन्यातील कॅप्टन विक्रम बोलतोय असा फोन येतो. तुमच्या भागात आमचे १५ ते २० जवान आलेले आहेत. त्यांचे जेवण बनवायचे आहे. ते बनवून ठेवा. पार्सल तयार करा. पैसे देऊन ते जवान पार्सल घेऊन जातील, असे सांगितले जाते. त्यानंतर पुन्हा फोन येतो. तुमच्या बँक खात्याचा क्रमांक द्या. आम्ही तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतो, असे सांगितले जाते. हॉटेल मालकाशी बोलणारी व्यक्ती ही अत्यंत सराईतपणे व आत्मविश्वासाने बोलत असते. हिंदी व इंग्रजी भाषेत संभाषण करते. त्यानंतर हळूहळू बँक खात्याची माहिती घेऊन ओटीपी मागवते. नंतर बँक खात्यातून पैसे लंपास करण्याचा प्रकार घडतो.

हे प्रकार अहमदनगर, श्रीरामपूर व राहुरी या जिल्ह्यामध्ये खुप मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. येथील अनेक हॉटेल चालकांना असे फोन आले. दरम्यान नगरच्या एका हॉटेल चालकाची सुमारे ३५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने या हॉटेल मालकाच्या बँक खात्यातून पैसे काढून घेण्यात आले. बेलापूर येथील सुजीत हॉटेलचे मालक सुनील मुथा यांनाही अशाच प्रकारे गंडा घालण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांच्या दक्षतेमुळे त्यांचे पैसे वाचले.

लष्करी अधिकाऱ्यांचे नाव वापरुन ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यातून पैसे लंपास करण्याच्या घटना वाढत आहेत. लष्करातील जवान हे सेवाकार्यात असतांना बाहेर हॉटेलमध्ये जेवत नाहीत. त्यामुळे हॉटेल मालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.