राज्यातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले असून आतापर्यंत फक्त दहा टक्के विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळाले आहे.
राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वाना आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचे आधार कार्ड जमा न झाल्यास शाळेवर कारवाई करण्याचा बडगाही शासनाने उगारला आहे. त्यासाठी जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, तरीही अजून फक्त दहा टक्के विद्यार्थ्यांचेच आधार कार्ड काढून झाले आहे. राज्यात एकूण ८० लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील जेमतेम आठ लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून झाले आहे.
विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. राज्यात पाच लाखांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. मात्र, त्यातल्या ३१ हजार शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे आधार कार्ड काढून झाले असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
अपुऱ्या सुविधांमुळे आधार कार्डाच्या नोंदणीमध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यातच आता परीक्षा आणि त्यानंतर उन्हाळी सुट्टय़ा येऊ घातल्या आहेत. त्यामुळे नियोजित मुदतीमध्ये आधार कार्डाचे काम पूर्ण होण्यासाठी जेमतेम एक महिन्याचा कालावधी उरला आहे. या कालावधीमध्ये आधार कार्डाचे काम पूर्ण होणे  कठीण असल्याचेही विभागातील काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.