कचरामुक्त वेंगुल्र्याचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचा दावा

औरंगाबादचा कचरा प्रश्न जटील बनल्याचे चित्र असले तरी हा प्रश्न अगदी दोन दिवसांत सुटणारा आहे. हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी अवघे १० ते १५ लाख रुपयेच लागतील. या पैशांतून खरेदी केलेल्या यंत्रणेतून व कचऱ्याचे विघटन करणारी व्यवस्था उभारली तर महिन्याकाठी महानगरपालिकेलाच उलट १५ ते २० लाख रुपयांचे सरासरी उत्पन्न मिळून शहर स्वच्छ व सुंदर होऊ शकते, असा विश्वास वेंगुल्र्याचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी व्यक्त केला. वेंगुर्ला राज्यात आणि देशातही कचरामुक्त शहर म्हणून ओळख निर्माण करण्यात रामदास कोकरे यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. सध्या औरंगाबादची कचराकोंडी सोडविण्यासाठी त्यांना सरकारने विशेष अधिकारी म्हणून पाठविले आहे.

एकीकडे औरंगाबादच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते विभागीय आयुक्तांपर्यंतचे अधिकारीही कामाला लागले आहेत. त्यासाठी बैठकांवर बैठका होत आहेत. अगदी शंभरावर कोटींची यंत्रणा उभी करण्याचे प्रस्ताव प्रशासकीय स्तरावरून सादर होत असताना सरकारी यंत्रणेतीलच एक घटक असलेल्या कोकरे यांच्या मताला आणि विश्वासाला महत्त्व प्राप्त होत आहे. विशेष म्हणजे औरंगाबादच्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी जो चमू तयार केला आहे,  त्यातलेच एक कोकरे आहेत. मागील काही दिवसांपासून ते येथे येत आहेत. या प्रश्नाबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना कोकरे म्हणाले, औरंगाबादचा कचरा प्रश्न दोनच दिवसात सुटू शकतो. दोन दिवसांसाठी एक एकर जागा द्या, शहरातील सध्याचा मिश्र स्वरुपातील कचरा तेथे आम्ही एकत्र करू आणि त्याची वर्गवारी करून नंतर ओला व सुका कचराच आम्ही नागरिकांकडून घेऊ. वर्गवारीत आम्हाला विघटन होऊ न शकणाऱ्या चिप्ससारख्या पॉकिटांचाच तेवढा प्रश्न येईल. त्यासाठी विभागनिहाय दोन ते पाच लाखांना मिळणारे क्रशर यंत्र खरेदी करावे लागतील. तीही चार ते पाच. उर्वरित कचऱ्याची २७ प्रकारांत वर्गवारी करून तो विकला जाईल. आम्ही वेंगुर्ला, कर्जतमध्ये थर्माकोल २५ रुपये किलोने विकतो. काचेची बाटली १ रुपये किलोने विकतो. अशा २७ प्रकारच्या कचऱ्यातून पालिकेला महिन्याकाठी दोन लाखांचे उत्पन्न मिळते. ५० हजार लोकसंख्येच्या कर्जतमध्ये आम्ही एवढे उत्पन्न घेतो आहोत. औरंगाबादची लोकसंख्या १५ लाख गृहित धरली तर महिन्याकाठी १५ ते २० लाख रुपये उत्पन्न कचऱ्यातून मिळू शकते. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून कचरा ही मुळात समस्याच नाही. तिच्याकडे सोन्याचे अंडी देणारी कोंबडी म्हणूनच पाहिले पाहिजे. सध्याची समस्या ही एक प्रकारे इष्टापत्ती ठरू शकते, असे मत कोकरे यांचे आहे.

कोकरे यांनी राज्यात आणि देशातही कचरामुक्त शहराचा वेंगुर्ला पॅटर्न निर्माण केल्यानंतर त्याची चर्चा आता जागतिक स्तरावरही होऊ लागली आहे. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या परिषदेचे यजमानपद भारताकडे असून त्याला उपस्थित राहण्यासाठी कोकरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शिवाय कचरामुक्त वेंगुर्लावर आता इंग्लंडमधील जॉर्जिया बोनी ही तरुणी थेट पीएच.डी. करीत आहे. कचरामुक्त वेंगुर्ला पाहण्यासाठी दरवर्षी २० हजार लोक भेटी देतात. त्यात पोपटराव पवार यांच्यासारखेही विकासाची दृष्टी लाभलेले समाजकारणी असतात. देशविदेशातून वेंगुर्ला पाहण्यासाठी लोक येत आहेत. आता कर्जतचीही कचरामुक्त शहर होण्याकडे वाटचाल सुरू असल्याचे कोकरे यांनी सांगितले.

‘गारबेज’मध्ये तरबेज व्हायचा निश्चय

कचऱ्याच्या समस्याने मलाही त्रस्त केले होते. उपाय शोधत असताना काही अडचणी आल्या. त्यानंतर मात्र गारबेजमध्ये (कचऱ्यात) तरबेजच व्हायचे असा निश्चय केला. मराठवाडय़ात केजमध्ये कचऱ्यांच्या वाहनाला जीपीएस यंत्रणा बसवण्याचा प्रयोग नंतर राज्यात इतरही ठिकाणी लागू झाला. दापोली २०१० साली कॅरिबॅग मुक्त केले. वेंगुर्ला पॅटर्न तर कमालीचा यशस्वी झाला. आता कर्जतही त्या मार्गावर आहे. तेथील कचऱ्याचा प्रश्न २० दिवसांत मिटवला.

– रामदास कोकरे, मुख्याधिकारी, कर्जत.

वर्गवारीची शिस्त महत्त्वाची

आपले शहर कचरामुक्त करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ओला व सुका कचरा देण्याची शिस्त लावून घेतली पाहिजे. त्यासाठी अवघे दोन ते पाच मिनिटही लागत नाहीत. उदा. भाजी निवडली तर त्यातील काडय़ा-कुडय़ा एकात तर खराब झालेल्या अन्नासारखा ओला भाग अन्य एका पिशवीत जमा करा. प्लास्टिक वेगळे करा. ही शिस्त महत्त्वाची. तेही अगदी सुरुवातीचे काही दिवस. आपले शहर स्वच्छ दिसत असेल तर लोकांचे सहकार्य अपेक्षेपेक्षाही अधिक मिळेल. असे न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड करू. सध्या मनपापुढे लोकांचा गमावलेला विश्वास कमावण्याचेही आव्हान आहे आणि तो पुन्हा मिळवणे अवघडही नाही, असे मत कोकरे यांचे आहे.