राहुरी येथे झालेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अकराव्या साहित्य संमेलनावर १ लाख ९४ हजार ५५ रूपये खर्च झाला. एकुण जमा रकमेतील ७४८ रूपये शिल्लक असून संयोजकांना ५ हजार ४०० रूपयांचे देणे आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अकरावे साहित्य संमेलन दि. १९ व २० जानेवारीला राहुरी येथे झाले. महिनाभरातच त्याच्या जमा-खर्चाचा तपशील संयोजकांनी जाहीर केला आहे. तसे आश्वासन निधी संकलनाच्या वेळीच देण्यात आले होते. एक रूपया आणि मुठभर धान्याचे आवाहन करीत संयोजकांनी या संमेलनासाठी निधी गोळा केला होता. एक रूपयापासून १० हजार रूपयांपर्यंतची आर्थिक मदत संमेलनासाठी प्राप्त झाली. त्याची पावती संबंधीत देणगीदारांना देण्यात आली. ‘मुठभर धान्या’च्या आवाहनाला लोकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी असे एकुण १० हजार क्विंटल धान्य संमेलनासाठी गोळा झाल्याची माहिती जालिंदर घिगे यांनी दिली.
संमेलनासाठी रोख स्वरूपात एकुण १ लाख ९४ हजार ८०३ रूपये जमा झाले. त्यातील १ लाख ९४ हजार ५५ रूपये खर्च झाले असून ७४८ रूपये शिल्लक राहिले आहेत. मात्र डिजीटल बॅनर, ऑफसेट छपाई व चित्रीकरण अशा तीन गोष्टींचे ५ हजार ४०० रूपये देणे आहे.
संयोजन समितीने हा जमाखर्च तपशीलवार जाहीर करतानाच चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनाही त्याची प्रत पाठवली होती. राहुरीकरांनी ही परंपरा अबाधीत ठेवल्याबद्दल पोळके यांनी संयोजन समितीचे कौतुक केले आहे. तसेच स्वत:ला ‘अखिल भारतीय’ म्हणवून घेणाऱ्या ‘घालमोडे दादांनी’ही आमचा आदर्श घेऊन आजपर्यंतच्या साहित्य संमेलनांचा हिशोब जमाखर्चासह सादर करावा असे उपरोधिक आवाहन केले आहे. तसा हिशोब ते देऊ शकत नसतील तर राज्य सरकारने जनतेच्या घामाचे पैसे त्यचांना मदत म्हणुन देऊ नये, अन्यथा ती जनतेची प्रतारणा ठरेल असे त्यांनी म्हटले आहे.