तुटवडय़ाचा परिणाम : राज्यात ४५ वर्षांवरील ४२ टक्के नागरिकांनाच लाभ

मुंबई : राज्यात लशींचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहीम संथगतीने सुरू आहे. राज्यभरात आतापर्यंत ४५ वर्षांवरील सुमारे ४२ टक्के तर १८ ते ४४ वयोगटातील सुमारे १२ टक्के नागरिकांनाच लशीची पहिली मात्रा मिळाली आहे.

राज्यात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जानेवारीपासून सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. मार्चपासून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. मेपासून लसीकरणाचे नवे धोरण लागू झाल्यानंतर लशींचा साठा सुरळीत न झाल्याने या वयोगटाचे लसीकरण संथगतीने होण्यास सुरुवात झाली. त्यात लशींचा साठाच उपलब्ध न झाल्यामुळे राज्याला १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणही थांबविण्याची वेळ आली. २१ जूनपासून लसीकरणाच्या धोरणात पुन्हा बदल झाल्यानंतर काही काळ लशींचा साठा मोठय़ा प्रमाणात प्राप्त झाला. परंतु जूनअखेर लसपुरवठय़ात खंड पडू लागल्याने लसीकरण मोहिमेवर परिणाम होऊ लागला.

राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे ३ कोटी ८६ लाख नागरिक आहेत. मार्चपासून या वयोगटाचे लसीकरण सुरू असूनही राज्यात गेल्या चार महिन्यांत सुमारे १ कोटी ६८ लाख नागरिकांना लशीची पहिली मात्रा मिळाली. ४५ वर्षांवरील लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे ४२.९५ टक्के नागरिकांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण झाले आहे. यातही सुमारे ३२ टक्के नागरिकांचे दुसऱ्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

राज्यात चिंताजनक स्थिती असलेल्या काही जिल्ह्यांमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण अधिक झाल्याचे दिसून येते. यात कोल्हापूरमध्ये ४५ वर्षांवरील सुमारे ७० टक्के नागरिकांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण झाले आहे. त्यापाठोपाठ सिंधुदुर्ग (६७ टक्के), सातारा (६३ टक्के), सांगली (६२ टक्के), गोंदिया (६१ टक्के) तर मुंबईचा (५७ टक्के) समावेश आहे. पुणे ५५ टक्के तर रत्नागिरीमध्ये ४५ टक्के या वयोगटातील नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे.

रायगड, पालघर, बुलढाणा मागे

बाधितांचे प्रमाण अधिक असलेल्या रायगड आणि बुलढाण्यात मात्र लसीकरण संथगतीने सुरू असल्याचे आढळले आहे. बाधितांचे प्रमाण सुमारे सात टक्के असलेल्या रायगडमध्ये ४५ वर्षांवरील सुमारे ३७ टक्के नागरिकांनीच लशीची पहिली मात्रा घेतली आहे. बुलढाण्यातही हीच स्थिती असून सुमारे साडेचार टक्के बाधितांचे प्रमाण असून ही येथे ४५ वर्षांवरील सुमारे ३७ टक्के नागरिकांनीच लशीची पहिली मात्रा घेतली आहे. पालघरमध्येही बाधितांचे प्रमाण सुमारे पाच टक्के असूनही येथे ४५ वर्षांवरील २७ टक्के नागरिकांना पहिली मात्रा दिलेली आहे.

४५ वर्षांवरील सर्वात कमी लसीकरण

राज्यात हिंगोली जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सर्वात कमी म्हणजे २६ टक्के नागरिकांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण झाले आहे. त्याखालोखाल नांदेड (२७ टक्के), सोलापूर (२९ टक्के) आणि औरंगाबाद (२९ टक्के) येथे ३० टक्कय़ांखाली पहिल्या मात्रेचे लसीकरण झाले आहे.

१८ वर्षांवरील सर्वात कमी लसीकरण

कोल्हापूरमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण अधिक झाले असले तरी १८ ते ४४ वयोगटातील लस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण मात्र सर्वात कमी १. ६६ टक्के आहे. या व्यतिरिक्त सोलापूर (२.३६ टक्के), अहमदनगर (४.९९ टक्के) तर बुलढाणा (५ टक्के) येथे सर्वात कमी लसीकरण झाले आहे.

१८-४४ वयोगटात आतापर्यंत १२ टक्केच लाभार्थी

मुंबईची आघाडी

’१ मेपासून १८-४४ वयोगटाचे लसीकरण सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून सरकारी केंद्रात मोठय़ा प्रमाणात लसीकरण सुरू झाले.

’राज्यात १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ५ कोटी ७१ लाख लोकसंख्या असून, यातील सुमारे ७१ लाख नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे.

’या वयोगटातील लोकसंख्येच्या तुलनेत केवळ १२ टक्के नागरिकांना पहिली मात्रा मिळाली आहे. यात मुंबईत ३३ टक्के नागरिकांना पहिली मात्रा मिळाली आहे. त्यापाठोपाठ पुणे (२८ टक्के), ठाणे(१४ टक्के) या जिल्ह्यंचा समावेश आहे.

राज्यात करोनाचे ८,५३५ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात रविवारी करोनाचे ८,५३५ नवे रुग्ण आढळले, तर १५६ रुग्णांचा मृत्यू झाला. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील रुग्णवाढ कायम आहे. राज्यात गेल्या २४ तासांत सहा हजार १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख १६ हजार १६५ इतकी आहे. मुंबईत ५५५, कोल्हापूर ११९३, सांगली ९२७, सातारा ७५५, रत्नागिरी ४५५, रायगड ३४६, पुणे ग्रामीण ५६५, पुणे मनपा ३०५, सोलापूर २९५ नवे रुग्ण आढळले.