जिल्ह्यात आतापर्यंत जेमतेम ८.७४ टक्के पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून भीजपाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापसाच्या पेरणीला प्रारंभ केला आहे. दि. १७ पर्यंत १७.९१ टक्के पेरणी पूर्ण झाली. ती ३५ टक्क्य़ांपर्यंत वाढली आहे.
जिल्ह्यात पाऊस लांबल्याने उडीद, मूग, भुईमूग ही पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. तब्बल महिनाभर उशिरा पडणाऱ्या भीजपावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी आता आंतरपिकात कापूस, सोयाबीन पेरणीला प्रारंभ केला. १७ जुलपर्यंत पडलेल्या भीजपावसावर अवलंबून जिल्ह्यात खरीप ज्वार ३.७२ हेक्टर, मका ०.१७ हेक्टर, तृणधान्य ३.८९ हेक्टर, तूर २८.५६, मूग ६.९४, उडीद ५.५३, कडधान्य ४१ हेक्टर या प्रमाणे पेरण्या उरकल्या.
सध्या भीजपाऊस सुरू झाल्याने कापूस, सोयाबीन या पिकांच्या पेरणीचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला काही भागात झालेल्या पावसावर विसंबून शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली. परंतु पावसाने ताण दिल्याने या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. या वर्षी पाऊस लांबल्याने मूग, उडीद व भुईमूग ही दिवाळी साजरी करणारी पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासात पडलेला पाऊस मिमीमध्ये : िहगोली ४.२९, वसमत १२.८६, कळमनुरी ७.३८, औंढा नागनाथ ८.२५, सेनगाव ३.६७. १ जून ते २२ जुलपर्यंत एकूण ३८३.४३ मिमी, सरासरी ७६.६९ व ८.७४ टक्के पाऊस झाला. गतवर्षी याच तारखेपर्यंत ४३.६८ टक्के पाऊस झाला होता.
जिल्ह्यात सध्या दोन ठिकाणी टँकर चालू असून, २६ लघुप्रकल्पांपकी १६ तलावातील पाणी जोत्याखाली, तर १० तलावात २५ टक्के पाणीसाठा आहे. धरणातील मृतसाठा, जिवंतसाठा, एकूण साठा दलघमीमध्ये व कंसात टक्केवारी : यलदरी १२४.६७७, ३१८.२४१, ४४२.९१८ (३९.३२ टक्के), सिद्धेश्वर १४४.३००, ०, १४४.३००, इसापूर ३१४.९६३७, ४२३.३१४५, ७३८.२७८२ (४३.९० टक्के).
दोन दिवसांपासून पडत असलेल्या भीजपावसावर शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली. मात्र, नदी, नाल्याला अजून पाणी नाही.
परंडय़ात केवळ २५ टक्के पेरणी, सर्वच धरणे कोरडी
वार्ताहर, उस्मानाबाद
पावसाळा सुरू होऊन आता दीड महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे परंडा तालुक्यातील सर्वच धरणे कोरडीठाक पडली आहेत. गतवर्षी याच कालावधीत २८२ मिमी पाऊस झाला. यंदा मात्र केवळ १०६ मिमी पाऊस नोंदला गेला. तालुक्यात केवळ २५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तालुक्यात सलग तिसऱ्या वर्षांत दुष्काळाची दाट छाया दिसू लागली आहे.
दरवर्षीच कमी पाऊस होऊन पाण्याची टंचाई परंडा तालुक्याच्या पाचवीला पुजलेली असते. मागील सलग दोन वर्षांत तर फारच कमी पाऊस झाल्यामुळे गतवर्षी एकही प्रकल्प भरू शकला नव्हता. यंदाही त्याहून बिकट स्थिती बनल्याचे सद्यस्थितीवरून जाणवत आहे. मागील १५ दिवसांपूर्वी झालेल्या अल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. २१ जुलपर्यंत केवळ २५ टक्के पेरणी पूर्ण झाल्याचे पंचायत समिती कृषी अधिकारी मंगेश चव्हाण यांनी सांगितले. पेरण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. दररोज सोसाटय़ाचा वारा व रात्रीच्या सुमारास हुडहुडी भरविणारी थंडी असे चित्र असून, पावसाचा मात्र पत्ताच नाही. तालुक्याची  पावसाची वार्षिक सरासरी ६१५ मिमी आहे. पावसाळ्याचा दीड महिना सरला, परंतु आजवर दीडशे मिमीही पाऊस पडलेला नाही.
तालुक्यातील चांदणी, खासापुरी, सीना-कोळेगाव, साकत आदी सर्वच धरणे कोरडी पडली असून, अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. सात गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ६३ िवधन विहिरी व २४ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे.