वाडय़ात डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा न भरल्याने आरोग्य सेवा आजारी

रमेश पाटील, वाडा

दोन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या वाडा तालुक्यात अवघी चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि तीन आरोग्य पथके आहेत. या सात आरोग्य केंद्रांचा भार फक्त चार डॉक्टर सांभाळत आहेत. या आरोग्य केंद्रांमधील सात डॉक्टरांच्या जागा आणि निम्म्याहून अधिक आरोग्य सेविका व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा वर्षभरापासून रिक्त आहेत.

वाडा तालुक्यात परळी, कुडूस, खानिवली आणि गोऱ्हे ही चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि गारगांव, सोनाळे आणि निंबवली ही तीन प्राथमिक आरोग्य पथके आहेत. या चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी दोन डॉक्टरांच्या जागा मंजूर आहेत. मात्र चारही ठिकाणी काही महिन्यांपासून एक एकच डॉक्टर कार्यरत आहेत. तर गारगाव, सोनाळे आणि निंबवली या तीन आरोग्य पथकांना डॉक्टरच नसल्याची स्थिती प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी असलेला वैद्यकीय अधिकारी हा एमबीबीएस असणे आवश्यक असताना वाडा तालुक्यातील एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर नाही. तसेच एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाही. सध्या जे कार्यरत आहेत त्यांच्या नियुक्त्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत.

वाडा तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांचा भार केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भरारी पथकातील डॉक्टरांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे दुर्गम भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे.

तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी यांच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त असल्याने या रिक्त जागांचा भार सध्या पदावर असलेल्या डॉक्टरांवर पडत आहे. त्यामुळे त्यांच्यावर ताण येत आहे.

वैद्यकीय अधिकारी यांच्याबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य सेविका, साहाय्यक, शिपाई यांच्याही काही जागा रिक्त असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे.

वाडा तालुक्यातील बराचसा भाग हा आदिवासी आणि दुर्गम असल्याने शासनाने काही भागासाठी आरोग्य पथके आणि भरारी पथके निर्माण केली आहेत. या पथकांसाठी नियुक्त डॉक्टरांना वेळोवेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामे पूर्ण करावी लागत आहेत. आरोग्य पथक आणि भरारी पथक परिसरात काम करणारे डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देण्यासाठी जात असल्याने शासनाने अतिदुर्गम भागात दिलेली आरोग्य सेवा बंद ठेवावी लागत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त आरोग्य अधिकारी यांचे काम करण्यासाठी सध्या भरारी पथकासाठी नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी दिली जात असल्याने भरारी पथकाकडे त्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

पावसाळ्यात स्थिती बिकट

प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सोयी-सुविधांचाही अभाव आहे. यामुळे  बहुतांशी रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले जाते. मात्र वाडा येथील ग्रामीण रुग्णालयही गेल्या अनेक वर्षांपासून आजारी असल्याने येणाऱ्या गंभीर रुग्णांना ठाणा सिव्हिलला स्थलांतरित केले जाते.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांबाबतचा अहवाल दरमहा आरोग्य संचालकांकडे पाठविला जातो. या जागा भरण्याचा अधिकार त्यांचाच आहे. या रिक्त जागांवर भरारी पथकातील वैद्यकीय अधिकारी सेवा देत आहेत.

– संजय बुरपल्ले, तालुका आरोग्य अधिकारी, वाडा