दुचाकी चालवताना सुरक्षेसाठी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टानेही हेल्मेट सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मात्र, काहीतरी कारणांनी लोक हेल्मेट वापरणे टाळतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीसांनाही हेल्मेटसक्ती सारखे कठोर उपाय योजावे लागत आहेत. त्यातून अनेकदा वादही निर्माण होत आहेत. मात्र, असे वाद टाळता येऊ शकतात आणि हेल्मेटचा सक्तीने वापरही करता येऊ शकतो, असे अनोखे संशोधन औरंगाबादच्या एका विद्यार्थ्याने केले आहे.

विस्मय विनोद तोतला (वय १२) असे या संशोधक विद्यार्थ्याचे नाव आहे. औरंगाबदमधील नाथ व्हॅली स्कूल या शाळेत नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने स्मार्ट हेल्मेटची निर्मिती केली आहे. या स्मार्ट हेल्मेटची कमाल म्हणजे, डोक्यावर हेल्मेट घालून बसल्याशिवाय दुचाकी सुरुच होणार नाही. तुम्ही जर मद्यप्राशन करुन दुचाकी चालवत असाल तर याची माहिती देणारा मेसेज तुमच्या लोकेशनसह घरच्या फोन क्रमांकावर पाठवला जातो आणि तुमची दुचाकाही आपोआप बंद होते. त्याचबरोबर तुमच्या दुचाकीचा अपघात झाल्यास अपघातस्थळ आणि रुग्णवाहिकेच्या नावासह माहिती कुटुंबियांच्या मोबाईलवर पाठवली जाते.

अशा या भन्नाट स्मार्ट हेल्मेटच्या निर्मितीसाठी विस्मयला एक महिन्याचा कालावधी लागला. या हेल्मेटमध्ये आर. एफ. ट्रान्समीटर, रिसीव्हर, अल्कोहल सेंसर, लिमिट स्वीचेस, जीपीएस अॅन्टिना या उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. त्याने निर्माण केलेला हा प्रकल्प पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या सीबीएससी शाळांच्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवडला गेला.

रस्त्यावर होणारे अपघात आणि मृत्यूंची संख्या याचा विचार करुन आपण हे हेल्मेट तयार केल्याचे विस्मयने सांगितले आहे. विस्मयचे आई-वडील हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. डॉ. विनोद आणि शिल्पा तोतला यांचा तो मुलगा आहे. विस्मयची आई शिल्पा तोतला यांनी त्याला या हेल्मेट प्रकल्पात मार्गदर्शन केले. तसेच विस्मयचे शिक्षक निलेश मेलगर यांचेही त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. फक्त गुगल सर्च करणे हा विस्मयचा आवडता छंद आहे. या छंदातून विस्मयने बरेच प्रयोग केले आहेत.

येत्या ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी विस्मयचा हेल्मेट प्रकल्पाचे सादरीकरण होणार आहे.