बाळासाहेब थोरात यांचा आरोप; काँग्रेसची ‘महापर्दाफाश’ सभा

भारतीय जनता पक्षाचे सरकार केवळ चार भांडवलदारांसाठी राबणारे सरकार आहे.  मंदीचा विळखा वाढतो आहे. वस्त्रोद्योग डबघाईला गेला, मात्र सरकार काहीच करत नाही. हे सरकार घोषणा करण्यात पटाईत असून शेतकऱ्यांना अजूनही विम्याची रक्कम मिळाली नाही. सरकारने विमा कंपन्यांचा मात्र ४० हजार कोटी रुपयांचा फायदा करून दिला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने सुरू केलेल्या महापर्दाफाश सभेचा प्रारंभ सोमवारी अमरावतीत झाला.

सरकारवर टीका करताना थोरात म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात विम्याचे काम सरकारतर्फे हाताळले जात होते. या सरकारने ते खासगी कंपन्यांना सोपवले. शेतकऱ्यांना मात्र काहीच मिळाले नाही. शिवसेनेने पीक विम्यात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून त्यातील

नाना पटोले यांनी भाजपबरबरच शिवसेनेवरही टीका केली. सरकारतर्फे बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. यात एस.टी.च्या प्रत्येक तिकिटावर एक रुपया अधिभार घेतला जातो. या माध्यमातून प्रतिदिनी ६७ लाख रुपये मातोश्रीवर जातात, असा आरोप पटोले यांनी  केला. अलमट्टी धरणामुळे पुराची स्थिती ओढवली. सरकार गंभीर नव्हते असा आरोप  त्यांनी केला.

रावसाहेब शेखावतांची अनुपस्थिती

महापर्दाफाश सभेच्या प्रारंभाला माजी आमदार रावसाहेब शेखावत हे अनुपस्थित राहिल्याने गटबाजीविषयी चर्चा सुरू झाली. मात्र,  काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर यांनी ती फेटाळली. शेखावत यांची प्रकृती ठीक नसल्याने ते सभेला उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

थोरात-डॉ. देशमुख यांच्या भेटीची चर्चा

सभेपूर्वी शासकीय विश्रामगृहात भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. दरम्यान, ही भेट राजकीय नसून देशमुख यांच्याशी मैत्री आहे, म्हणून ते भेटायला आले असे स्पष्टीकरण थोरात यांनी दिले. डॉ. देशमुख यांनीही ही भेट राजकीय नव्हती, तर सहजपणे घडून आलेली सदिच्छा भेट होती, असे ‘लोकसत्ता’ला सांगितले.