News Flash

महसूलमंत्र्यांना घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न 

ण्यातील हवेली देवस्थान भूखंड प्रकरणातील पुराव्याची कागदपत्रे  पटलावर ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

सभागृहाबाहेर सत्ताधारी-विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई : पुणे जिल्ह्य़ातील भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांनी  दुसऱ्या दिवशीही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना रोखण्यासाठी सत्ताधारी सदस्यही आक्रमक झाले. त्यामुळे सभागृहाच्या बाहरेही सत्ताधारी व विरोधकांच्या घोषणांनी विधानभवनाचा परिसर दणाणून गेला.

देवस्थान जमीन व बालेवाडी भूखंड व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी गुरुवारी पुन्हा सभागृहात व सभागृहाच्या बाहेर पत्रकार परिषदेत आरोप केला. पुण्यातील हवेली देवस्थान भूखंड प्रकरणातील पुराव्याची कागदपत्रे  पटलावर ठेवल्याचे त्यांनी सांगितले.  ते म्हणाले की, ब्रिटीशकालीन नोंदवहीत नोंद नाही म्हणून ती देवस्थान जमीन नाही असे महसूल मंत्र्यांनी बुधवारी सांगितले होते. परंतु ब्रिटीशकालीन  नोंदवहीत तशी नोंद असल्याचा पुरावा आपण सभागृहात सादर केला, त्यामुळे चंद्रकात पाटील या प्रकरणात दोषी आहेत हे सिध्द होत आहे, असा दावा त्यांनी केला. बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी महसूल मंत्र्यांनी राज्य शासनाचा ४२ कोटी रुपयांचा  महसूल बुडवल्याचा आरोप त्यांनी केला.

आणखी काही प्रकरणे काढणार

महसूल मंत्री तसेच अन्य काही मंत्री आणि भाजपमधील दोन आमदारांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आपण शुक्रवारी काढणार आहे, असे जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. त्याचबरोबर बांधकाम खात्यातील अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्या बदल्यांचे दर किती आहेत, हे सांगताना मुंबईत व कोल्हापुरात दोन माणसे पैसे जमा करण्याचे काम करतात, असे पाटील यांनी सांगितले.

विधान परिषदेत महसूल मंत्र्यांवरील कथित भ्रष्टाचाराचा आरोप आणि धनगर समाजाच्या आरक्षणावरुन गदारोळ झाला, त्यामुळे सभागृहाचे कामकाज बंद पडले. त्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य गली गली मे शोर है, भाजप-सेना चोर है अशा घोषणा देत विधान भवनाच्या बाहेर आले.

विरोधी सदस्य विधानभवनाच्या पायऱ्यावरुन सरकारविरोधी घोषणा देत असताना, त्यांच्या पाठोपाठ भाजपचे प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेचे सदस्य घोषणा देत आक्रमकपणे पुढे आले. महसूल मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुराव्यासह प्रकरण काढून विरोधक आरोप करीत असताना सत्ताधारी पक्षांनी सभागृह बंद पाडले, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 1:12 am

Web Title: opponents in legislative council target chandrakant patil over land scam zws 70
Next Stories
1 धनगर आरक्षणावरून विधान परिषदेत गदारोळ
2 ‘मुद्रा’तील थकीत कर्ज दडविण्यासाठी मुदतवाढीचा उतारा
3 कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस
Just Now!
X