विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून आटपाडीचे गोपीचंद पडळकर यांना संधी मिळाली असून यामुळे जिल्हयातील भाजप आमदारांची संख्या पाच होणार आहे. धनगर समाजातील तरुण नेतृत्व म्हणून पडळकर यांना संधी देत असताना भाजपने निष्ठावंत गटावर पुन्हा अन्याय केला आहे.

विधान परिषदेसाठी अनेक दिग्गज इच्छुक असताना या सर्वाना डावलून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख करणारे पडळकर हे वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसमोर बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून मदानात उतरले होते. विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्याविरूध्द अंतिम क्षणी मदानात उतरूनही त्यांनी ३ लाखाहून अधिक मतदान घेतले होते. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी सांगलीतून बाहेर पडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बारामती मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी घेत निवडणूक लढवली होती. लक्षवेधी निवडणुकीत त्यांनी पराभव स्वीकारला असला तरी मातब्बर उमेदवाराविरूध्द मदानात उतरून त्यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले हेते.

एकेकाळी राष्ट्रीय समाज पार्टीमध्ये सक्रिय कार्यकत्रे असलेल्या पडळकर यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्या वेळी भाजपने विद्यमान खा.पाटील यांना संधी दिली. प्रचारादरम्यान, वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वतचा असा गट तयार केला. या जोरावर त्यांनी प्रसंगी भाजपच्या प्रस्थापित  नेत्याविरूध्दही आवाज उठविण्यात हयगय केली नाही. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजप विरोधात उमेदवारी दाखल करूनही विधानसभा निवडणुकीवेळी फडणवीस यांनी बारामतीमधून निवडणूक लढविण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनीही निवडणूकही लढवली होती. मात्र त्याच वेळी त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्याचा शब्द देण्यात आला होता. त्यानुसार आता विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आली आहे.

निष्ठावंतांमध्ये नाराजी

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचे बस्तान बसविण्यात मोलाची कामगिरी करणारे प्रदेश सचिव मकरंद देशपांडे, शिराळा मतदार संघातील काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये आलेले सत्यजित देशमुख आणि ११ महिन्याची आमदारकी  लाभलेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना डावलून पडळकर यांना संधी दिल्याने पक्षांतर्गत तीव्र नाराजी पसरली आहे.