कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी विरोधात शनिवारी ग्रामीण भागातील नागरिकांनी पुन्हा एकदा आवाज बुलंद केला. हद्दवाढविरोधी कृती समितीने मोर्चा, आंदोलने, निवेदने या माध्यमांतून विरोध करण्याचे ठरविले असून १४ जुल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आज झालेल्या मेळाव्यात घेण्यात आला. हद्दवाढ विरोधात राजू माने यांच्या अध्यक्षतेखाली ओम गणेश कार्यालयात झालेल्या मेळाव्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे सचिन चौगले, नाथाजी पवार, बबन रानगे, बी.आर.पाटील, अनुरिमा माने, विमल पाटील आदींसह १७ गावांतील प्रतिनिधी उपस्थित होते. १७ गावांची बाजू मांडणारी जनहित याचिका लवकरच उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.
राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जुलपर्यंत हद्दवाढीबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. महापालिका व नगररचना विभाग यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने अभिप्राय मागितला आहे. या संभाव्य हद्दवाढीस विरोध करण्यासाठी, तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी १७ गावांतील लोकप्रतिनिधी व नागरिकांचा मेळावा घेण्यात आला.
१७ गावांचा हद्दवाढीत समावेश होण्यास विरोध कशासाठी आहे, याचे विवेचन करताना राजू माने म्हणाले, महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर पुरेशा प्रमाणात पायाभूत सुविधा मिळणार नाहीत. उलट करांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला उद्भवणाऱ्या समस्यांबाबत जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासह लोकप्रतिनिधींना निवेदन देण्याचा कृती कार्यक्रम आखून सर्वानी मिळून हद्दवाढीस विरोध दर्शविणे गरजेचे आहे.
नाथाजी पवार म्हणाले, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीतील प्रस्तावित गावांमधील बहुतांश जमिनी या बागायती आहेत. त्यामुळे या ठिकाणचा तरुणवर्ग हा दुग्ध व शेती व्यवसायामध्ये आहे. या ठिकाणच्या शेतीचे नुकसान करून नागरीकरण करू नये. वास्तविक शहरे असुरक्षित आहेत परंतु ग्रामीण भागातील जनता आजही सुरक्षित आहे.