मुंबईला जागतिक व्यावसायिक केंद्र बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समितीची स्थापना करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी टीका करून मुख्यमंत्र्यांचा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्याच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झालेले असताना त्यांनी केलेल्या या मागणीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे विधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी केले होते. त्यामुळे त्याच मुद्याला धरून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापना करण्याची मागणी केली असावी. मुख्यमंत्र्यांच्या या मागणीमुळे मुंबईचा विकास करण्यासाठी राज्य सरकारमध्ये क्षमता नसल्याचे सिद्ध होते. मुंबईचा विकास गुजरातच्या हाती दिला जात असेल तर त्याला विरोध करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला फायदा पोहोचवण्यासाठी हे करीत आहे, याबाबत संशय येत आहे. राज्याचा विकास करण्यासाठी राज्य सक्षम नसेल तर त्यांनी आमच्याकडे जबाबदारी द्यावी, असेही ठाकरे म्हणाले. काँग्रेसचे पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मुंबईचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय चुकीचा असून तो राज्याला कमकुवत करणारा आहे.
राज्य सरकारचा कमकुवतपणा या निमित्ताने समोर आला आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असल्यामुळे त्यांनी देशाचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्रात भाजपाचे सक्षम नेते असताना मोदींच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यामागे मुख्यमंत्र्यांना काय साधायचे, असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या विकासासाठी उच्चाधिकार समिती नियुक्त करण्याची मागणी म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये चांगले मंत्री नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. एकीकडे मुंबईमधील उद्योग गुजरातमध्ये घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू असताना आता नरेंद्र मोदी यांच्या हातात मुंबईचा विकास दिला जाणार आहे. मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही आणि तसा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादीस काँग्रेस त्या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा आव्हाड यांनी दिला.