पक्षांतर्गत बंडाळीमुळे सांगली-साताऱ्याची विधान परिषदेची जागा गमवाव्या लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी जिल्ह्य़ातील नगरपालिका निवडणुकांमध्ये आव्हान उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्य़ाचे नेतृत्व करणारे माजी मंत्री जयंत पाटील यांची त्यांच्या मतदारसंघातच विरोधकांनी एकत्र येऊन कोंडी केली आहे.

[jwplayer DfBlas1q-1o30kmL6]

इस्लामपूर शहर हे राजारामबापू पाटील यांची कर्मभूमी. त्यांच्यापाठी ती जयंत पाटील यांची राजकीय वारसाभूमी ठरली आहे. गेली अनेक वर्षे जयंत पाटील यांचे या नगरपालिकेवर आणि पर्यायाने शहरातील राजकारणावर वर्चस्व आहे. पण यंदा सर्वच विरोधक त्यांच्याविरोधात एकवटले आहेत. त्यातच आजपर्यंत त्यांनी ज्यांना राजकीय ताकद दिली ते निशिकांत पाटील हेदेखील नगराध्यक्षपदाची संधी हुकणार हे लक्षात येताच विरोधी विकास आघाडीत सहभागी झाले आहेत. या विरोधी आघाडीत भाजप नेते विक्रम पाटील, शिवसेनेचे आनंदराव पवार, स्वाभिमानीचे राज्यमंत्री खोत, यांच्यासह काँग्रेस, मनसे यांची मोट बांधण्यात खासदार राजू शेट्टी हे यशस्वी झाले. विरोधक एकत्र येणे अशक्य वाटत असतानाच चमत्कार घडला. यामुळेच पाटील यांच्यासाठी बालेकिल्ल्यातच मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबांचा गड मानल्या जाणाऱ्या तासगावची निवडणूकही यंदा चुरशीची होत आहे. आबांच्या पश्चात होत असलेल्या या निवडणुकीत तासगावकर राष्ट्रवादीच्या मागे उभे राहतात की खासदार संजयकाका पाटील यांच्या रूपाने भाजपला आपलेसे करतात हे पाहावे लागेल. संजयकाकांसाठी हा गड कायम राखणे जिल्ह्य़ाच्या राजकारणासाठी आवश्यक असल्याने त्यांनी खास मुख्यमंत्र्यांची सभाही आयोजित केली होती.  राष्ट्रवादीचा गड आमदार सुमनताई पाटील या सांभाळत असल्या तरी या नेतृत्वाला मर्यादा असल्याचेही दिसून येते आहे.

याशिवाय विटा येथे गेली ४० वष्रे सत्ता असणारे काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील हे आपला गड राखतात की शिवसेनेचे आमदार अनिल बाबर सत्ता हिसकावून घेतात याचीही उत्सुकता लागली आहे. पलूस नगरपालिका, कडेगाव नगरपंचायत येथे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामध्ये होणाऱ्या सामन्यात नेहमीप्रमाणे पतंगराव बाजी मारतात का, याचीही उत्सुकता आहे.

[jwplayer N6aft4np-1o30kmL6]