केंद्र सरकारच्या सुधारित भूसंपादन विधेयकामुळे ग्रामीण भागाच्या विकासासह शेतकऱ्यांनाही फायदा होणार होता. मात्र, काँग्रेससह काही राजकीय पक्षांनी याला विरोध करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत वटहुकूम न काढण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसचे या मुद्यावर पितळ उघडे पडेल, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
केंद्रीय ग्रामविकास खात्याची सूत्रे काही काळ आपल्याकडे असताना या कायद्याबाबत एकमत व्हावे म्हणून दोन वेळा सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठका घेतल्या. त्यात काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांनीच दुरुस्त्या सुचविल्या होत्या. मात्र, बैठकीत एक आणि बाहेर एक, अशी भूमिका काँग्रेसने घेतली असा आरोप गडकरींनी केला.
मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
सुधारित भूसंपादन विधेयक मागे घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी स्वागत केले आहे. नीती आयोगाच्या बैठकीतच अनेक मुख्यमंत्र्यांनीच याबाबत मागणी केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.