महाराष्ट्रातील विकासाला खीळ घालण्यासाठीच विरोधकांनी दंगली सुरू केल्या आहेत, असा आरोप भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी केला. ते बुधवारी लोकसभेत भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या मुद्द्यावरील चर्चेत सहभागी झाले होते. काँग्रेससह विरोधकांकडून भीमा कोरेगाव हिंसाचारासाठी संघ परिवार आणि भाजपाला जबाबदार धरले जात आहे. मात्र, रावसाहेब दानवे यांनी चर्चेला उत्तर देताना विरोधकांवरच दंगल घडवल्याचे आरोप केले. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात भाजपचे सरकार आहे. या काळात राज्याचा विकास जोमाने सुरू असून कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. त्यामुळेच आता विरोधकांनी या विकासाला खीळ घालण्यासाठी दंगली सुरू केल्याचे दानवे यांनी म्हटले.

तत्पूर्वी भीमा कोरेगाव येथे उसळलेल्या हिंसाचाराचा मुद्द्यावरून बुधवारी विरोधकांनी संसद दणाणून सोडली. आज सकाळीच विरोधकांनी या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली. त्यानंतर विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकुब झाले. तर दुसरीकडे लोकसभेत मात्र या मुद्द्यावर वादळी चर्चा झाली. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवत त्यांना मौनीबाबा म्हटले. त्यामुळे भाजपचे खासदार चांगलेच संतापले.

अंधेरीत आंदोलनकर्त्यांचा सॉफ्टवेअर कंपनी बंद करण्याचा प्रयत्न

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करण्याची मागणी खरगे यांनी केली. खरगे यांच्या वक्तव्यावर संसदीय कार्यमंत्री अनंत हेगडे यांनी आक्षेप घेतला. काँग्रेस आग विझविण्याऐवजी आग भडकावण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही खरगे यांना फटकारले. याप्रश्नी राजकारण करण्यापेक्षा चर्चा व्हावी असे सांगत त्यांनी खरगे यांना संसदेत योग्य भाषा वापरण्याचा सल्ला दिला. तुम्हाला दलितांची भलं आणि चर्चाही नकोय का, असा सवाल करत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. त्यामुळे यावर खरगे यांनी जास्त भाष्य न करण्याची विनंतीही त्यांनी केली.

मराठा समाजाने मोठ्या भावाप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदावे- छत्रपती संभाजीराजे