10 April 2020

News Flash

दहा हजार कोटींच्या पॅकेजची मागणी

‘फडणवीस तुम्हाला झोप यायला नको, सहकारी शेतकरी रोज आत्महत्या करताहेत. आम्ही चुका केल्या म्हणून आम्हाला ही शिक्षा मिळाली.

| December 11, 2014 03:18 am

‘फडणवीस तुम्हाला झोप यायला नको, सहकारी शेतकरी रोज आत्महत्या करताहेत. आम्ही चुका केल्या म्हणून आम्हाला ही शिक्षा मिळाली. आता तुम्ही चुका करू नका. सत्तेत येण्यापूर्वी जे बोलले ते करून दाखवा. ही गोष्ट गांभिर्याने घेण्याची गरज आहे’ या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सरकारला इशारा देत शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपये पॅकेजची मागणी केली. ‘सत्तेत नसताना तुम्ही जे मागितले त्यापैकी ५० टक्के केले तरी हरकत नाही’ या शब्दात ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी सरकारचे कान टोचले.
विधानसभेत बुधवारी प्रारंभापासूनच केवळ दुष्काळावर चर्चा झाली. चैनसुख संचेती, जयप्रकाश मुंदडा व इतर सदस्यांनी नियम २९३ अन्वये मूळ प्रस्ताव मांडला. मागील आघाडी सरकारने ३ लाख ४४ हजार कोटी रुपये कर्जाचा बोजा शासनावर टाकला. प्रत्यक्षात काहीच न केल्याने राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नाने १ हजार ७५ कोटी रुपये पॅकेज आणले. मात्र, तत्कालीन सरकाने त्यातून बँकांना असलेली घेणी वळती करून घेतली. शेतकऱ्याच्या हाती काहीच न आल्याने आत्महत्या वाढल्या. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विदर्भातील सहा जिल्ह्य़ांसाठी ३७५० कोटी रुपये पॅकेज सिंचनासाठी दिले. सिंचनाचे नियोजनच नसल्याने १८०० कोटी रुपये अखर्चिक पडले असल्याचा आरोप केला. राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाल्यास मोठा निधी येईल व शेतकऱ्याला मदत करता येईल, असे भाजपचे चैनसुख संचेती म्हणाले.
दुष्काळ निवारणार्थ केलेल्या कामाची जंत्री माजी मदत व पुनर्वसन मंत्री व काँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी सादर केली. विरोधात असताना हेच आर्थिक मदतीची मागणी करीत होते. तेव्हा भूलथापा मारल्या ते करा. आम्ही मदत देताना बजेटचा विचार केला नाही. विरोधात असताना तुम्ही जे सांगितले त्याचे चिंतन करा व अंमलबजावणी करा, काल आमच्या कामाचे वाभाडे काढले. आता आमच्यापेक्षा जास्त दुपटीने मदत करा, पाच वर्षांत तुम्ही दुष्काळ संपवला तर अभिनंदनास पात्र रहाल, असे खडे बोल पतंगरावांनी सुनावले.
सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाल्या आहेत. त्या थांबल्या पाहिजेत. शेतकऱ्यांचे दु:ख मोठे आहे. त्यासाठी कर्ज काढा. खर्चात काटकसर करा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना पेंशन द्या. त्यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या. मराठवाडय़ाला विशेष पॅकेज देण्याची गरज आहे. सोयाबीन, धान, कापूस आदी सर्वच उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यांना किमान साडेसहा हजार रुपये आधारभाव द्या. दुधाचा दर वाढवा, त्यासाठी त्याला अनुदान द्या. तोडलेली वीज द्या. पीक कर्ज माफ करा, दुष्काळ व दहा हजार कोटी रुपये पॅकेज जाहीर करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. राजुऱ्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्येची परवानगी मागितली आहे. मुख्यमंत्री फडणवीस विदर्भातले असताना असे का व्हावे. ‘फडणवीस तुम्हाला झोप यायला नको, सहकारी शेतकरी रोज आत्महत्या करताहेत. हाच का तुमचा न्याय, असा सवालही त्यांनी केला.
याआधीच्या आघाडी सरकारने १४ हजार कोटी रुपये मदत दुष्काळग्रस्तांना दिली. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी तातडीने मदत केली. महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर केलेला नसल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्याच्या खालावलेल्या स्थितीत त्याचे कर्ज माफ करा, रोहयो सुरू करा, त्याचे समुपदेशन करा, त्याला दिलासा द्या, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करा असे छगन भुजबळ म्हणाले.  ‘सत्तेत नसताना तुम्ही जे मागितले त्यापैकी ५० टक्के केले तरी हरकत नाही’ या शब्दात ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी सरकारचे कान टोचले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2014 3:18 am

Web Title: opposition demands 10000 crore package to tackle drought
Next Stories
1 मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी
2 विधान परिषदेत खडसे सभागृह नेते
3 विरोधी पक्षनेतेपदावरून रस्सीखेच
Just Now!
X