21 October 2020

News Flash

अन्नदात्याला वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी परिस्थिती, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा !

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून मराठवाड्यासह कोकणातील शेतीला याचा मोठा फटका बसला आहे. राज्यभरात शेतकऱ्यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात यावी अशी मागणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहीलं आहे.

“गेल्या ३-४ दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तो मदतीसाठी आर्जव करीत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत, यापलिकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकर्‍यांना मदत तर मिळतच नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वार्‍यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे”, अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

कोकणात निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, मराठवाड्यातील अतिवृष्टी यापैकी एकाही प्रसंगात राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी उभी राहिले नाही. आता पुन्हा परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशी, धान इत्यादी पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. पीक काढणीचे काम सुरू असतानाच हा तुफान पाऊस झाल्याने आता शेतकर्‍यांच्या हाती पीक लागणार नाही. सोयाबीनच्या लागवडीचाही खर्च निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत असतानाही सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याबद्दल फडणवीसांनी सरकारची कानउघडणी केली आहे.

अनेक जिल्ह्यात पूर्वीच्याच पंचनाम्यांनंतर नुकसानभरपाई अजून मिळाली नाही. सातत्याने विनंती करूनही राज्य सरकारकडून कोणतीही मदत दिली जात नाही. बांधावर २५ आणि ५० हजार हेक्टरी मदतीची मिळालेली आश्वासनं स्मरून तर शेतकर्‍यांना आणखी वेदना होत आहेत. मराठवाड्यातील प्रश्न फारच गंभीर आहेत. तेथे तातडीने मदत पोहोचविण्याची गरज आहे. आधीच कोरोनामुळे राज्यातील प्रत्येक घटक हवालदील झाला असल्याने, या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आता तरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकर्‍याला मदत मिळेल, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 7:15 pm

Web Title: opposition leader devendra fadanvis demand to declear wet draught in state writes letter to cm uddhav thackrey psd 91
Next Stories
1 गुंड प्रवृत्तीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, भाजपाची मागणी
2 मदरशांचे अनुदान बंद करण्याची भाजपाची मागणी सुडबुद्धीची – नवाब मलिक
3 जलयुक्त शिवार योजनेची चौकशी व्हावी का? पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Just Now!
X