५ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे विरोधीपक्ष नेते म्हणून निवड करण्यात आली. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर भाजपाने मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेतला. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ३ पक्षांनी मिळून सरकार बनवल्यानंतर सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली.

यावेळी मुख्यमंत्र्यांसह सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी फडणवीस यांचं अभिनंदन केलं. अभिनंदन प्रस्तावावर बोलत असताना, सत्तापक्षातील काही आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या, मी पुन्हा येईन ! या घोषणेवरुन त्यांची फिरकी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनीही, फडणवीसांनी मी परत येईन ही घोषणा खरी करुन दाखवल्याचा टोला लगावला. ज्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनीही सर्वांचे आभार मानताना परत आलो तर तुमच्यासकट येईन असं म्हणत भुजबळांची फिरकी घेतली.

“राज्यातील जनतेने १०५ जागा निवडून आणत आम्हाला जनमताचा कौल दिला. मात्र लोकशाहीत जमनत नाही तर आकडेवारीचा खेळ चालतो. मी परत येईन ! असं मी म्हणालो होतो, आणि ठरवल्याप्रमाणे आलोही….मात्र काही कारणांमुळे आज विरोधी पक्षात आहे. मात्र लोकशाहीत अशा गोष्टी होत असतात.” जर सेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे ३ पक्ष एकत्र येत असतील तर भविष्यात काहीही होऊ शकतं असं सांगायलाही फडणवीस विसरले नाही.