News Flash

अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या : देवेंद्र फडणवीस

...नाहीतर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल !

प्रतिकात्मक छायाचित्र

करोनावर यशस्वीरित्या मात करुन घरी परतलेल्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली आहे. अतिवृष्टी-बोंडअळीच्या रोगामुळे कापूस-सोयाबीनचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेली मदत, शेतमाल खरेदी सुरु होण्यास होत असलेला विलंब यावरुन फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

अवश्य वाचा – कांद्याचं बियाणं व रोपांचा साताऱ्यात तुटवडा, मनमानी भावांमुळे शेतकरी अडचणीत

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, “बोंडअळी, बोंडसडीमुळे यंदा विदर्भात कापसाचे मोठे नुकसान झालेले आहे. आताच्या अनुमानानुसार ५० टक्क्यांच्या वर हे नुकसान असून, ते आणखी वाढत जाणार आहे. साधारणत: एकरी ६ क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना अनेक ठिकाणी एकरी १ क्विंटल आणि फार कमी ठिकाणी २ क्विंटलपर्यंत उत्पादन होताना दिसून येत आहे. अतिवृष्टीने सोयाबीनचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनचे नुकसान जवळजवळ ८० टक्क्यांच्या आसपास आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ही स्थिती आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही कुठेही सरकारच्या वतीने प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत.”

अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात जो शासन आदेश काढण्यात आला, त्यात विविध निकष ठेवल्याने विदर्भातील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. दुसरीकडे शेतमालाची खरेदी अजून प्रारंभ झालेली नाही. ओलसर कापसाला खाजगी व्यापारी भाव देत नाही, त्यामुळे शेतकर्‍याची पिळवणूक होते आहे. सोयाबीन सुद्धा ओला असल्याने ३ हजार रूपयांपेक्षा कमीच भाव मिळत आहे. राज्य सरकारने तातडीने विदर्भातील प्रशासनाला निर्देश देऊन, दिवाळी ७ दिवसांवर आली असताना तातडीने मदत वितरित करावी. ही कारवाई त्वरेने पूर्ण न केल्यास विदर्भातील शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाईल. अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 5:09 pm

Web Title: opposition leader devendra fadanvis urge state government to help farmers psd 91
Next Stories
1 कांद्याचं बियाणं व रोपांचा साताऱ्यात तुटवडा, मनमानी भावांमुळे शेतकरी अडचणीत
2 यंदाची दिवाळी ‘फुस्स’ होणार?; राज्य सरकारचा फटाके बंदी करण्याचा विचार
3 अर्णब गोस्वामी यांची क्वारंटाइन सेलमध्ये रवानगी
Just Now!
X