News Flash

यवतमाळ जिल्ह्यातील मृत्यू, रुग्णदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वैद्यकीय महाविद्यालयास अनपेक्षित भेट

देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वैद्यकीय महाविद्यालयास अनपेक्षित भेट

यवतमाळ : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अचानक भेट देऊन आढावा घेतला. जिल्ह्यातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेबाबत तीव्र नापंसती व्यक्त करीत जिल्ह्यात वाढलेला करोना मृत्यू व रुग्णदर कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यासोबतच रुग्णांच्या उपचारांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनास केल्या.

जिल्ह्यात मृतांची संख्या का वाढत आहे, याचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस बुधवारी दुपारी थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक आदींची बैठक घेऊन जिल्ह्यातील करोनास्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात रुग्ण व मृत्यूसंख्या वाढत असल्याने चाचण्या, रुग्णांचा संपर्कशोध, प्रतिबंधित क्षेत्र वाढवण्यावर भर द्यावा, अशा सूचना केल्या.

वैद्यकीय महाविद्यालयात बहुतांश रुग्णांना प्रारंभी ‘सारी’ वॉर्डात दाखल केले जाते. याच ठिकाणी अधिकांश रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती असल्याने प्रशासनाने या उपचार पद्धतीत बदल करावा. ज्यांचा एचआरसीटी स्कोर १०च्या आत आहे, अशा रुग्णांना ‘सारी’ रुग्णांच्या कक्षात न ठेवता स्वतंत्र विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू करावे. तसेच या रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना फडवणीस यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील प्राणवायूची उपलब्धता, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्धतेबाबतही त्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात प्राणवायू उपलब्ध आहे. मात्र रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत दिली. जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत फडणवीस यांनी बैठकीतूनच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली. तसेच इंजेक्शन उत्पादक कंपनीशी संपर्क साधून यवतमाळसाठी अतिरिक्त साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर रुग्णांचा ताण येऊ नये यासाठी उमरखेड, वणी, पुसद या तालुक्यांच्या ठिकाणी सरकारी दवाखान्यात सर्व सुविधायुक्त खाटांची अतिरिक्त व्यवस्था करून त्या भागातील रुग्णांवर तेथेच उपचार करावे, अशा सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केल्या. बैठकीला खासदार बाळू धानोरकर, माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. मदन येरावार, आ. डॉ. अशोक उईके, आ. संदीप धुर्वे, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

करोना चाचण्यांची गती वाढवण्याची गरज -फडणवीस

वर्धा : करोना चाचण्यांची गती वाढवण्याची गरज आहे. सरकार काय भूमिका घेते, त्यावर भाजप पुढचे पाऊल टाकेल. आम्ही जनतेसोबत आहो, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. करोनाविषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फ डणवीस बुधवारी वर्धा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी सामान्य रुग्णालयात भेट देऊन विलगीकरण कक्षाची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व खासदार रामदास तडस त्यांच्यासोबत होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्थानिक पातळीवर उपचाराच्या प्राथमिक सोयी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. तसे झाले तरच समर्पित कोविड रुग्णालयावरील भार कमी होईल. प्रशासनाने त्यासाठी आवश्यक पावले तत्परतेने टाकण्याची गरज आहे. जिल्हय़ातील काही दुर्गम भागात उपचाराच्या सोयी करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे येत असतील तर प्रशासनाने तत्परतेने नोंद घेतली पाहिजे. वैद्यकीय मनुष्यबळाची सर्वत्रच कमतरता आहे. त्यासाठी काही अतिरिक्त लोकांच्या सेवा घेणे आवश्यक आहे. प्राणवायू खाटांची कमतरता दिसून येते. त्या वाढवण्याची तयारी असावी. मृत्यूसंख्येच्या आकडय़ांचे विश्लेषण आवश्यक आहे. टाळेबंदीसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, सरकार काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे. त्यानंतरच भाजप आपली भूमिका ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. खा. तडस तसेच आ. समीर कुणावार व दादाराव केचे यांच्याशी त्यांनी स्वतंत्र चर्चा केली. दोन मोबाईल चाचणी वाहने उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. तसेच सावंगीच्या रुग्णालयात वाढीव व्हेंटिलेटर पुरवणे शक्य असल्याचे फ डणवीस यांनी नेत्यांकडे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 1:09 am

Web Title: opposition leader devendra fadnavis an unexpected visit medical college zws 70
Next Stories
1 यवतमाळात खासगी कोविड रुग्णालयात तोडफोड
2 विनाकारण बाहेर पडलेले ५ जण बाधित आढळले
3 पंढरपूरमध्ये मतमोजणीसाठी करोना चाचणी बंधनकारक
Just Now!
X