महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नुकतेच राज्यमंत्री पद मिळालेले शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याच्या बातम्या माध्यमांवर झळकल्यानंतर, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीक केली आहे. या सरकारच्या पतनाची सुरूवात झाली असल्याचे सांगत, केवळ मलाईदार खात्यांसाठी भांडण सुरू असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

हे विश्वासघाताचं सरकार आहे. हे सरकार असंच जाईल अशी अवस्था आहे. असंही विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. वाशिम येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, आजच तुम्ही बघा काय अवस्था आहे, सरकार बनलं. अगोदर तर विस्तारच होत नव्हता. महिनाभरानंतर विस्तार झाला. विस्तार झाल्यानंतर हे देखील कधीच झालं नाही की, महाराष्ट्राच्या इतिहासात महिनाभर कोण मंत्री आहे हेच माहिती नाही. मग मंत्री झाले तर आता मंत्र्यांच खातेवाटप मागील सात दिवस होत नाही. सगळ्यांना मलाईदार खाती हवी आहेत, मलाईदार खाती. कोणी कृषी विभाग वैगेरे घ्यायला तयार नाही. त्यासाठी भांडण नाही, मलाईदार खाती द्या, पीडब्ल्युडी खात इत्यादींसारखी खाती मागितली जात आहेत. मलाईदार खात्यांसाठी हे जनतेला विसरले व भांडत आहेत. अद्यापही या सरकारचं खाते वाटप झालेलं नाही.

तसेच, खातेवाटप होण्याअगोदरच मला समजलं की आता त्यांच्या एक मंत्र्याने राजीनामा देखील दिला. ते म्हणाले की मला मंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु मला राज्यमंत्री बनवलं असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला म्हणजे या सरकारच्या पतनाची सुरूवात सरकार बनायच्या आतच सुरू झालेली आहे, असंही फडणवीस यांनी यावेळी बोलुन दाखवलं.