नगर : महिला-बालकल्याण व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना घेऊन जाणाऱ्या  हेलिकॉप्टरने आज, शनिवारी सायंकाळी अचानक नगरमध्ये ‘इमर्जन्सी लँडिंग’ केले. त्या कोठून आल्या व कोठे चालल्या याची जिल्हा प्रशासनातील कोणत्याच अधिकाऱ्याला माहिती नव्हती, भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तर त्या नगरमध्ये येऊन गेल्या, काही वेळ थांबल्या, याचाच मुळात पत्ता लागला नाही. मात्र त्यांच्या इमर्जन्सी लॅंडिंगसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मदत केली. काही दिवसांपूर्वीच मंत्री मुंडे यांनी संगमनेरमध्ये बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी पूर्वी आपली ‘सेल्फी’ प्रकरणात पाठराखण केली होती, याची आठवण सांगितली होती. त्यामुळे आता मंत्री मुंडे यांना काँग्रेसचे थोरात यांच्यापाठोपाठ विखे यांचीही मदत झाली. परंतु तरीही नगर शहरात दोन हेलिपॅड उपलब्ध असताना मुंडे यांचे हेलिकॉप्टर विखे यांच्या विळद घाटातील हेलिपॅडवर का उतरवले गेले, हा प्रश्न अणुत्तीर्णच राहिला.

आज दुपारी अचानक जिल्हा प्रशासनातील काही मोजक्याच अधिकाऱ्यांना मंत्री मुंडे यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर विळद घाटातील विखे फाउंडेशनच्या हेलिपॅडवर थांबणार असल्याची माहिती मिळाली. मात्र त्या का थांबणार आहेत, कोठून आल्या, कोठे चालल्या याची काहीच माहिती त्यांना मिळाली नाही. पोलिसांनाही त्यांचे हेलिकॉप्टर थांबणार आहे, एवढीच माहिती होती. विखे फाउंडेशननेही घाई करत विळद घाटातील हेलिपॅड तयार ठेवले. फाउंडेशनच्याही काही ठरावीक अधिकाऱ्यांनाच याची माहिती होती. विखे फाउंडेशनच्या हेलिपॅडवर मंत्री मुंडे येणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. शहरातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तर याबद्दल अनभिज्ञच होते.

सायंकाळी साडेचारला मुंडे यांचे हेलिकॉप्टर येणार असल्याचे कळवले गेले होते. काही मोजकेच पोलिस बंदोबस्तासाठी उपस्थित होते. फाउंडेशनमधील चार अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के व वासुदेव सोळंके असे ग्रामविकासचे चार अधिकारी वगळता, हेलिपॅडवर अन्य कोणी उपस्थित नव्हते. पाच वाजता हेलिकॉप्टरचे आगमन झाले, अधिकाऱ्यांनी मंत्र्यांचे स्वागत केले, त्यांच्याशी चर्चा केली, काही वेळाने मुंडे सरकारी वाहनात बसून निघून गेल्या. त्यामागोमाग अधिकारीही निघून गेले.

रात्री उशिरा चौकशी करता समजलेली माहिती अशी, मंत्री मुंडे यांना आष्टी येथून औरंगाबादला जायचे होते. मुख्यमंत्रीही आज औरंगाबादेत होते. मुंडे यांना औरंगाबादला सोडून हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईला जाणार होते. परंतु हेलिकॉप्टर आष्टीतून उडण्यासच उशीर झाला, ते मुंडे यांना औरंगाबादला सोडून वेळेत मुंबईला पोहोचू शकणार नव्हते. मुंडे यांनाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला वेळेत पोहोचण्याची घाई होती. त्यामुळे ‘शॉर्टकट’ म्हणून त्या हेलिकॉप्टरने नगपर्यंत आल्या व सरकारी वाहनाने औरंगाबादला रवाना झाल्या. नगर शहरात पोलिस मुख्यालय व बुऱ्हाणनगरला खासगी कंपनीचे असे दोन हेलिपॅड आहेत, त्याऐवजी इमर्जन्सी लँडिंगसाठी विखे फाउंडेशनच्या विळद घाटातील हेलिपॅडची निवड कोणी व का केली गेली, या प्रश्नाचे उत्तर पोलिसांसह जिल्हा प्रशासनातील कोणत्याच अधिकाऱ्यांकडे नव्हते.

मंत्री मुंडे गेल्या बुधवारी (दि. ९) संगमनेरमध्ये होत्या. त्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरातही होते. याच कार्यक्रमात मुंडे यांनी आपण नव्यानेच मंत्री झाल्यानंतर घडलेल्या ‘सेल्फी’ प्रकरणात आ. थोरात यांनी कशी पाठराखण केली होती, याची माहिती जाहीर भाषणात दिली होती. थोरात यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसच्याच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनीही मुंडे यांना ‘इमर्जन्सी लँडिंग’साठी मदत केली.