जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला दोन दिवस राहिले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले आहेत. त्यांचा संयुक्त मेळावा उद्या (रविवार) सकाळी ११ वाजता नगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा विकास आघाडीचे अध्यक्ष वसंतराव कापरे व भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा. भानुदास बेरड यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी नगरलाच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसमधील माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची युती आहे. गेल्या वेळीही त्यांनी अशीच आघाडी करून बँकेची सत्ता हस्तगत केली होती. आताही राष्ट्रवादी-थोरात गट (शेतकरी विकास मंडळ) विरूध्द विखे (जिल्हा विकास आघाडी) अशीच निवडणूक होत आहे.
बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या मंगळवारी (दि. ५) होत आहे. संचालकांच्या एकूण २१ जागांपैकी ६ जागांवरील निवडी बिनविरोध झाल्या असून त्यातील ५ जागा जिंकून राष्ट्रवादी-थोरात गाटने आघाडी घेतली आहे. विखे गटाची एक जागा बिनविरोध झाली आहे. उर्वरीत २५ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात असून काँग्रेसमधील थोरात-विखे गटातच खरी चुरस आहे. दि. ७ ला मतमोजणी होणार आहे.
बँकेचा सर्वागीण विकास व शेतकरी हिताच्या योजनांसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वसंतराव कापरे व बेरड यांनी संयुक्तपणे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. उद्या (रविवार) सकाळी ११ वाजता नंदनवन लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास विधानसभेतील विरोधी पक्षनेते विखे यांच्यासह जिल्ह्य़ाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा या निवडणुकीतील एक उमेदवार जयंत ससाणे, भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, राजीव राजळे, आदी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
कर्डिलेंबाबत उत्सुकता
भाजपचे आमदार तथा बँकेचे विद्यमान संचालक शिवाजी कर्डिले यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत आता विखे-भाजप अशी युती झाली असली तरी, कर्डिले मात्र विरोधी राष्ट्रवादी-थोरात गटाच्या प्रचारात सक्रिय आहेत. विविध ठिकाणच्या त्यांच्या प्रचारसभांनाही कर्डिले यांनी हजेरी लावली आहे. ते उद्याच्या मेळाव्यास उपस्थित राहणार की नाही, याकडे या वर्तुळात लक्ष आहे.