शेतकरी मदत प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

नागपूर : बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक आणि तुडतुडेबाधित धान उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा तसेच आपत्कालीन मदत निधीतून मदतीचे वाटप सुरु आहे. बीटी बियाणे कंपन्यांकडून भरपाईची प्रक्रियाही सुरु असून आतापर्यंत सरासरी १२ हजार रूपये हेक्टरी याप्रमाणे ३८ लाख  शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईच्या थेट रकमा जमा झाल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सगळे पैसे दिले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. बियाणे कंपन्यांकडून भरपाई मिळवून देण्यात दिरंगाई करणाऱ्या कृषी खात्यातील अधिकाऱ्यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. विरोधकांनी सोमवारी मध्यरात्री केलेल्या ठिय्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर ते बोलत होते.

राज्यातील  शेतकऱ्यांच्या विविध प्रशांनावर नियम २९३ अन्वये विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रस्तावाला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांनी सोमवारी उत्तर दिले होते. मात्र बोंडअळी, मावा आणि तुडतुडय़ामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने सन २०१७च्या हिवाळी अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे मदत दिली नसल्याचा आरोप करून, ही मदत दिल्याशिवाय सभागृह सोडणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. सोमवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमाराला विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर विखे पाटील यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहातच ठिय्या मांडला. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट आणि गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सातत्याने विरोधी पक्षांची मनधरणी केली. परंतु, सरकार जोवर ठाम घोषणा करत नाही, तोवर सभागृहाबाहेर न पडण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि मंगळवारी सभागृहात निवेदन करण्याचे आश्वासन दिल्यावर विरोधकांनी  आपले आंदोलन मागे घेतले.आज कामकाज सुरु होताच याबाबतचे निवेदन करताना बोंडअळी आणि तुडतुडय़ामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या मदतीचा तपशीलच सभागृहात मांडला. पीक विम्यासाठी ४४ लाख शेतकऱ्यांनी दावा दाखल केला होता. त्यापोटी २,३६७ कोटी रुपयांची मदत मंजूर असून त्याचे वाटप सुरु आहे. बाधित शेतकऱ्यांना सरासरी हेक्टरी १२ हजार रुपयांप्रमाणे पैसे दिले जात असून ४४ लाख शेतकऱ्यांपैकी ३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.