सांगली, कोल्हापुरात निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून सत्ताधारी पक्षावर टीकेचा भडिमार केला जात असताना विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील वगळता कोणीही नेता पूरग्रस्तांकडे फिरकलेला नाही. नदीकाठचे लोक गेले सहा दिवस अभूतपूर्व संकटाशी सामना करीत असताना राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना वाऱ्यावर सोडल्याचेच चित्र शनिवापर्यंत दिसत होते.

सांगलीत कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडून सहा दिवस झाले. तर वारणेचेही पाणी पात्राबाहेर पडले. याचा फटका सांगली शहरासह मिरज, वाळवा, पलूस आणि शिराळा तालुक्यातील नदीकाठच्या लोकांना बसला. प्रशासकीय यंत्रणा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणि बचावासाठी प्रारंभीच्या तीन दिवसांत तोकडय़ा साधनानिशी प्रयत्नशील होती. मात्र शुक्रवारपासून या मदत कार्याला वेग आला आहे.

अशा स्थितीत पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केवळ आ. जयंत पाटील आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. विश्वजित कदम वगळता अन्य विरोधी पक्षांनी सांगलीकडे पाहिले सुद्धा नाही. शेजारच्या जिल्ह्य़ात कराडमध्ये असतानाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अद्याप येथे आलेले नाहीत. मात्र त्यांचे निकटचे कार्यकत्रे आणि शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व त्यांचे कार्यकत्रे गेले आठ दिवस मदत कार्यात व्यस्त आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केवळ पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून दौरा आटोपता घेतला, तर खा. शरद पवार यांनी तब्बल सहा दिवसांनंतर  सांगलीसाठी वेळ काढला आहे.  मनसेचे राज ठाकरे हे पुराच्या कारणावरून सरकारवर टीका करीत आहेत, मात्र त्यांच्या पक्षाचे कार्यकत्रे मदत कार्यात कुठेही दिसले नाहीत. तर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे सुरक्षित स्थळी बसून सरकारवर आणि प्रशासनावर टीका करून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत.  तर या उलट भाजप-शिवसेनेचे अनेक मंत्री, कार्यकत्रे मात्र मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवरील विविध पक्षाचे कार्यकत्रे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पक्षीय पातळीवरील मतभेद बाजूला सारून प्रयत्नशील असल्याचे चित्र पूरग्रस्त सांगलीत आहे.