राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून (दि. १७) सुरुवात होत असून या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष आक्रमक होणार आहे. त्यासाठी अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीसह इतर सर्व विरोधीपक्षांच्या गटनेत्यांची रविवारी (दि.१६) बैठक आयोजित करण्यात आली आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील बी-४ या शासकीय निवासस्थानी सकाळी ११ वाजता विरोधीपक्षांच्या गटनेत्यांची बैठक होणार असून त्यानंतर दुपारी विरोधीपक्षांची पत्रकार परिषद होणार आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्यावतीने सायंकाळी चहापानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या चहापानाला उपस्थित राहायचे की नाही यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय अधिवेशनातील रणनितीही ठरवली जाणार आहे.

राज्यातील दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, शिक्षणातील गोंधळ, आरक्षणाचे रखडलेले प्रश्‍न यांसह अनेक प्रश्नांवर विरोधीपक्ष सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.