यवतमाळ पंचायत समितीत सुमारे ३ कोटी ३३ लाख रुपयांचा मुद्रांक शुल्काचा अपहार की अनियमितता यावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी दीपक केसरकर यांना कोंडीत पकडले. अखेर सुधीर मुनगंटीवार, गिरीश बापट त्यांच्या मदतीला धावून आले.
 मुद्रांक शुल्काच्या अपहारासंदर्भात संदीप बजोरिया व अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यातील छापील उत्तरात हे खरे असल्याचे मान्य करण्यात आले होते. त्यामुळे अपहार झाला आहे, तर कारवाई का नाही, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना केसरकर यांनी ‘वित्तीय अनियमितता’ असा शब्द वापरला त्यावरून धनंजय मुंडे यांनी त्यांना कोंडीत पकडले. यात मंत्र्यांचाच तर हात नाही ना, असा प्रश्न किरण बावस्कर यांनी उपस्थित करताच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उभे राहिले. या संदर्भातील चौकशीचा अहवाल १५ दिवसांत घेतला जाईल, असे मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, केसरकर यांनी धनादेशाच्या रूपात निधी देण्यात आल्याने अपहाराचा प्रश्न नाही. प्रश्न भ्रष्टाचाराचा नाही, तर निधी वितरणाचा आहे. सकाळी अधिकाऱ्यांना या चुकीच्या उत्तरासंदर्भात मी बोललो, असे केसरकर यांनी सांगताच विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातला.