राज्य विधिमंडळाचे आज, सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन हे मुख्यत: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सिंचनाची श्वेतपत्रिका याभोवती फिरणार आहे. विरोधकांनी अजितदादांच्या विरोधात आक्रमक होण्याचा इशारा दिला असतानाच सभागृहात विरोधकांना दाखवूनच देतो, असे आव्हानच अजितदादांनी दिले आहे. दुसरीकडे, अविश्वास ठराव मांडण्याच्या मुद्दय़ावरून शिवसेना एकाकी पडली असून, यावरून विरोधकांच्या ऐक्यालाच सुरुंग लागल्याचे चित्र रविवारी दिसून आले.
मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची परंपरा या वेळीही विरोधकांनी कायम ठेवली आहे. सिंचनाच्या श्वेतपत्रिकेवर आक्रमक होण्याचे संकेत विरोधी पक्षांनी दिले असून, भाजपने रविवारी सरकारच्या श्वेतपत्रिकेचा पंचनामा करणारी ‘काळी पत्रिका’ प्रसिद्ध केली. त्यात सरकारच्या आकडेवारीत कशी विसंगती आहे हे दाखवून देण्यात आले आहे. सिंचनाच्या श्वेतपत्रिकेबरोबरच वीज भारनिमयन, टोल, कायदा आणि सुव्यवस्था यावरून सरकारची व प्रामुख्याने राष्ट्रवादीची कोंडी करण्याची भाजपची योजना आहे. मात्र विरोधकांतील समन्वयचा अभाव अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच दिसून आला. सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव शिवसेनेने दाखल केला असतानाच मनसेने पाठिंबा देणार नाही, असे जाहीर केले.
मुख्य विरोधी पक्ष भाजपनेही नंतर बघू, असे सांगत शिवसेनेला एकाकी पाडले. शिवसेना मात्र अविश्वासाच्या ठरावावर ठाम आहे.     
सभागृहात दाखवून देतो अजित पवारांचेहीविरोधकांना खुले आव्हान
विरोधकांनी कितीही आरोप केले तरीही त्यांना कसे सामोरे जायचे हे सभागृहात दाखवून देतो, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांनाच रविवारी खुले आव्हान दिले. विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याचा आपला इरादा असल्याचे अजितदादांनी सूचित केल्याने सोमवारपासून सुरू होणाऱ्या दोन आठवडय़ांच्या हिवाळी अधिवेशनात दादा विरुद्ध विरोधक, असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.  राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि पत्रकारांनी केलेल्या प्रश्नाच्या सरबत्तीला सर्व काही सभागृहातच उत्तर दिले जाईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अधिक बोलणे टाळले. मात्र सिंचन घोटाळा उघडकीस आल्यापासून विरोधकांच्या आरोपांच्या फैरी झेलणारे उपमुख्यमंत्री अजित पावर आज पुन्हा जुन्याच ‘दादागिरी’च्या मूडमध्ये होते.