नगर : एकही केंद्रीय मंत्री भ्रष्टाचारात आढळत नाही म्हणून विरोधकांची अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहांच्या विरोधात कोल्हेकुई सुरू आहे. विरोधकांचा हा खोटारडा प्रचार आहे. खोटे बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा प्रचार काँग्रेस करत आहे, असा आरोप केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

पुण्याहून शिर्डीला जाताना मंत्री प्रकाश जावडेकर नगरमध्ये खा. दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी आज, शनिवारी काही वेळ थांबले होते. त्या वेळी ते बोलत होते. जावडेकर यांचा हिंद सेवा मंडळाचे पदाधिकारी ब्रीजलाल सारडा, शिरीष मोडक आदींनी सत्कार केला. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अनिकेत पाटील यांच्या प्रचारासाठी जावडेकर यांनी पेमराज सारडा महाविद्यालयातील शिक्षकांशी संवाद साधला.

काँग्रेस व राष्ट्रवादीचा काळा कारभार बाजूला करून देशभरातील मतदार भाजपला समर्थन देत आहेत. महापालिकेपासून ते ग्रामपंचायतपर्यंत सर्व ठिकाणी भाजपचा विजय होतो आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे दलाल हद्दपार करत भाजपने भ्रष्टाचारमुक्तीचा कारभार गेल्या ४ वर्षांत दिला. राजीव गांधी म्हणत, १०० रुपये दिले, की गरिबांपर्यंत १५ रुपयेच पोहोचतात. आता मोदींच्या काळात १०० पैकी १०० रुपये गरिबांच्या खात्यात जमा होतात.  २०१४ मध्ये मोदी सत्तेवर आले तेव्हा ६ राज्य भाजपकडे होती, आता ती संख्या २० झाली आहे, कॉग्रेसकडे १७ राज्यांत सत्ता होती, ती संख्या आता ३ वर आली आहे, याचाच अर्थ देशातील लोक भाजपच्या कारभाराबद्दल समाधानी आहेत, असा दावा जावडेकर यांनी केला.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या ताब्यातील अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या नोटांवरून होणाऱ्या आरोपांकडे लक्ष वेधले असता जावडेकर म्हणाले, की देशभरात भाजपला मिळणाऱ्या समर्थनातूनच विरोधकांची कोल्हेकुई सुरू झाली आहे. अहमदाबादच्या बँकेबाबत खोटारडे आरोप विरोधक करत आहेत. खोटे बोल पण रेटून बोल अशी पद्धत ते वापरत आहेत.

शिवसेना स्वतंत्र निवडणुका लढण्याची भाषा करत आहे, याकडे लक्ष वेधले असता जावडेकर यांनी त्रोटकपणे, भाजप व शिवसेना सध्या दोघेही एकत्र सत्तेत आहेत, असे मर्यादित उत्तर दिले.