करोनाचा मुकाबला करत असलेल्या ठाकरे सरकारसमोर नवा वाद निर्माण झाला आहे. लॉकडाउन असताना उद्योगपती कपिल वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला पर्यटनासाठी परवानगी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचगणी पोलिसांनी उद्योगपती कपिल वाधवान यांच्यासह २३ जणांना ताब्यात घेतल्यानंतर ही घटना समोर आली. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुणाच्या आशिर्वादानं वाधवान कुटुंब महाबळेश्वरला गेलं? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलासा करण्याची मागणी केली आहे.

करोनाच्या वाढत्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्रासह देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. महाराष्ट्र सरकारनं जिल्ह्याच्या सीमाही बंद केल्या. त्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठा करणाऱ्या वाहनांनाच वाहतुकीची परवानगी देण्यात आलेली आहे. अशा कडक वातावरणात डीएचएफएल घोटाळ्याशी संबंध असलेल्या उद्योगपती कपिल वाधवान यांच्यासह २३ जणांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्यात आली. हे सगळे महाबळेश्वरलाही गेले. तेथे पाचगणी पोलिसांनी वाधवान यांच्यासह २३ जणांना ताब्यात घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

हे प्रकरण माध्यमातून चर्चेत आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ठाकरे सरकारला प्रश्न विचारला आहे. “महाराष्ट्र श्रीमंत आणि वजन असलेल्या लोकांसाठी लॉकडाउन नाही का? पोलिसांच्या परवानगीनं कुणी महाबळेश्वरमध्ये कुणी कसं सुट्या घालवू शकतं. एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी स्वतःच्या हिंमतीवर अशी चूक करेल हे शक्य नाही. त्यामुळे हे कुणाच्या आशिर्वादानं झालं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याचं उत्तर द्यावं,” असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

कुणी दिली परवानगी?

हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर वाधवान कुटुंबियांना परवानगी देणारं गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्रही माध्यमातून समोर आलं आहे. या पत्रात वाधवान हे आपले मित्र असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना खंडाळाहून महाबळेश्वरला जाऊ द्यावे, असं म्हटलेलं आहे.