नागपूरसह विदर्भात पुढचे चार दिवस उष्णतेची लाट असणार आहे. ऑरेंज अलर्ट हवामान खात्यातर्फे जाहीर करण्यात आला आहे. ३० एप्रिलपर्यंत विदर्भात पारा उच्चांकी असेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मागील ६ दिवसात तापमानाचा पारा ६ अंशांनी वाढला आहे. ज्यामुळे विदर्भातले रहिवासी बेजार झाले आहेत. वाढता पारा आणि उन्हाचा झटका यामुळे नागपूरकर हैराण झाले आहेत.

२६ ते ३० एप्रिल या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजेच उष्णतेची लाट होय. या लाटेमध्ये तापमान हे सामान्य तापमानापेक्षा ४ ते ५ अंशांनी जास्त असते. वाढत्या उष्णतेमुळे नागपुरात दुपारी शुकशुकाट दिसतो आहे. सकाळच्या वेळात किंवा सूर्य मावळल्यानंतर लोक गरजेच्या कामांसाठी बाहेर पडत आहेत. नागपुरात जे चित्र मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात असते ते एप्रिल महिन्याच्या शेवटी दिसून येते आहे.

दरम्यान अकोल्यात उष्णतेचा पारा ४६ अंशांच्यावर गेला आहे. उष्णतेच्या झटक्यामुळे शेषराव नामदेव जवरे या तरूणाचा मृत्यू झाला. अकोल्यातील जिल्हा स्त्री रूग्णालय भागात शेषरावचा मृतदेह आढळला. मागील दोन दिवसांपासून अकोल्याचा पारा ४६ अंशांच्या वर आहे. तर वर्धा, अमरावती या भागात पारा ४४ आणि ४५ अंशांच्या घरात आहे. संपूर्ण विदर्भातच उष्णतेची लाट आली आहे.