21 September 2020

News Flash

संत्र्याच्या उत्पादनात महाराष्ट्र पुन्हा मागे

काही वर्षांपूर्वी संत्र्याच्या सर्वाधिक बागा आणि उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रातील संत्र्याची अवस्था आता अत्यंत बिकट झाली असून उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्राची नवव्या स्थानी घसरण झाली आहे.

| June 13, 2015 06:11 am

काही वर्षांपूर्वी संत्र्याच्या सर्वाधिक बागा आणि उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रातील संत्र्याची अवस्था आता अत्यंत बिकट झाली असून उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्राची नवव्या स्थानी घसरण झाली आहे. फलोत्पादन विभागाने नुकतीच २०१३-१४ या वर्षांतील संत्र्याचे उत्पादन आणि उत्पादकता जाहीर केली आहे, त्यातून हे कटू वास्तव समोर आले आहे.
देशातील १५ राज्यांमध्ये संत्री उत्पादन घेतले जाते. त्यातही कर्नाटक, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र हे प्रमुख उत्पादक प्रदेश आहेत. देशात सर्वाधिक संत्रा बागा महाराष्ट्रात असल्या, तरी उत्पादन आणि उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र तळाशी आले आहे. २०१२-१३ या वर्षांच्या तुनलेत संत्रा उत्पादकतेत झालेली सुधारणा हे एकमेव समाधान फलोत्पादन विभागाला आहे. राज्यात २०१२-१३ या वर्षांत १ लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्रात संत्रा बागांचे क्षेत्र होते. वर्षभरात ३ लाख ७० हजार मेट्रिक टन संत्र्याचे उत्पादन झाले आणि उत्पादकता होती २.७८ मे.टन प्रति हेक्टर. दुसऱ्या वर्षी म्हणजे २०१३-१४ मध्ये उत्पादकता सुधारली. एकूण १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रात संत्र्याच्या झाडांची लागवड होती, त्यातून ७ लाख ४२ हजार ५०० मे.टन संत्र्याचे उत्पादन झाले आणि उत्पादकता ५.५० मे.टन प्रति हेक्टर इतकी नोंदवली गेली.
पंजाबात संत्री बागांचे क्षेत्र महाराष्ट्राच्या तुलनेत निम्म्याहून कमी म्हणजे ४७ हजार १०० हेक्टर असले, तरी या राज्यात महाराष्ट्रापेक्षा अधिक म्हणजे १० लाख १७ हजार मे.टन संत्र्याचे उत्पादन घेतले गेले. उत्पादकता २१.६१ मे.टन प्रति हेक्टर इतकी आहे. पंजाबमध्ये पिकवला जाणारा संत्रा हा किन्नो या नावाने ओळखला जातो. नागपूर संत्र्यापेक्षा त्याच्या आकार आणि चवीत भिन्नता आहे. मध्यप्रदेशसारख्या शेजारच्या राज्याने देखील संत्रा बागांचे क्षेत्र वाढवतानाच उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा आघाडी घेतली आहे. मध्यप्रदेशात ५२ हजार हेक्टरवर संत्र्याच्या बागा आहेत, त्यातून ८ लाख ९४ हजार मे.टन उत्पादन झाले आणि उत्पादकता १७.०४ मे.टन प्रति हेक्टर इतकी नोंदवली गेली. आसाम आणि राजस्थान या राज्यांमधील संत्रा उत्पादकता ही महाराष्ट्रापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात संत्रा उत्पादन वाढीसाठी विविध उपायायोजना राबवूनही राज्यातील संत्रा उत्पादनात समाधानकारक वाढ होऊ शकलेली नाही. या अभियानात दहा वर्षांमध्ये संत्रा उत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, ते साध्य होऊ शकलेच नाही. उलट संत्रा उत्पादन कमी-कमी होत गेले. या अभियानात आदर्श रोपवाटिका तयार करणे, रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग क्षेत्र विस्तार, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन व उत्पादकता वाढवणे असे उपक्रम राबवले गेले खरे, पण ते कागदांवरच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सर्वाधिक संत्रा बागा या विदर्भात आहेत आणि सिंचनाचा अभाव हा संत्रा बागांना भेडसावणारा मोठा प्रश्न बनला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खोल होत चालली असताना शेतकऱ्यांसमोर संत्रा बागा वाचवण्याचे आव्हान आहे. फायटोप्थेरा यासारख्या रोगांच्या आक्रमणानंतर वेळीच उपाययोजना करण्यात न आल्याने लक्षावधी झाडे नष्ट झाली. सुविधांअभावी संत्रा बागांच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 6:11 am

Web Title: orange production in maharashtra
Next Stories
1 शेतकरी विधवेच्या आत्महत्येने प्रशासन हतबल
2 नंदुरबारमधील आगळीवेगळी टोल वसुली
3 ‘कृष्णा’ची रणधुमाळी शिगेला
Just Now!
X