निवडणूक प्रचारकाळात मतदारांना प्रलोभन दाखविले जाऊ नये, यासाठी सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्याच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. त्यासोबत बँकांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारावरही लक्ष ठेवण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ए. आर. नायक यांच्या उपस्थितीत शहरातील सराफा असोसिएशनचे पदाधिकारी व बँक अधिकाऱ्यांची बैठक या संदर्भात घेण्यात आली. निवडणुकी दरम्यान मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी एखाद्या प्रकारच्या दागिन्याची मागणी वाढून मोठय़ा प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विशिष्ट नमुन्यात दररोज दागिन्यांच्या विक्रीचा तपशील भरून सादर करण्यास सराफा व्यावसायिकांना सांगितले आहे.
दरम्यान, जालना मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात जबाबदारी संपविलेल्या विविध समित्यांच्या नोडल अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला. १ हजार ८६० मतदान केंद्रांसाठी २० हजार १३२ अधिकारी व कर्मचारी, तसेच २ हजार २४७ पोलीस अधिकारी व कर्मचारी आवश्यक असल्याचे या वेळी सांगण्यात आले. मतदान यंत्र तपासणीची पहिली फेरी पूर्ण झाली असून, मतदानाच्या १२ दिवस आधी दुसऱ्या फेरीतील तपासणी करण्यात येणार आहे. मतदान यंत्रे केंद्रावर पोहोचविण्यास प्रशासनास १९० वाहनांची आवश्यकता भासणार आहे.
प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती नुकतीच निवडणूक खर्च निरीक्षक रजनीशकुमार जेनव यांनी घेतली. मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपक्रमांची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी दिली. प्रचारासाठी होणाऱ्या खर्चाच्या माहितीचा तपशील कशा प्रकारे ठेवण्यात येतो, हे कोषागार अधिकारी कल्याण औताडे यांनी सांगितले.