पाचगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, जावेद मुल्ला, बाळासाहेब पोवार यांच्या खून प्रकरणात सामील असल्याचा आरोप करून गृहराज्यमंत्री सतेज पाटील व दिलीप जाधव यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. 
मंत्री पाटील यांच्या पाठबळामुळेच कोल्हापूर परिसरात गुन्हेगारी वाढत चालली असल्याचा आरोप करून महाडिक यांनी या प्रवृत्तींविरूध्द आंदोलन उभारणार असल्याचे या वेळी स्पष्ट केले.
अशोक पाटील यांचा तीन दिवसांपूर्वी भरदिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. यावरून राजकीय वर्तुळातून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी याबाबत आमदार महादेवराव महाडिक व धनंजय महाडिक या काका-पुतण्यावर कांही आरोप केले होते. त्याचे खंडन शनिवारी धनंजय महाडिक यांनी केले.    
कोल्हापुरातील राजकारण गढूळ होत चालल्याची कबुली देऊन धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे असे प्रकार होत चालले असल्याचे सांगितले. आमच्यासोबतही सर्व प्रकारच्या क्षेत्रातील लोक असले तरी त्यांना कसल्याही प्रकारच्या अवैध धंद्यांसाठी वा मारहाणीसाठी प्रवृत्त करत नाही. सकारात्मक राजकारण करण्यावर आमचा भर आहे. सतेज पाटील हे स्वत:ला प्रतिष्ठित म्हणवून घेत असले तरी त्यांचा चेहरा व मुखवटा वेगळा असून त्यांच्या पाठबळामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या दबावामुळे पोलीस खरी तक्रार नोंदवून घेण्यास नकार देत आहेत. पोलीस हे त्यांचे नोकर बनले असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाडिक म्हणाले,‘‘अशोक पाटील खून प्रकरणात मुख्य आरोपींना वगळून भलत्यांनाच आरोपी म्हणून उभे करण्याचा प्रयत्न सुरू होता. तसे झाले असते तरी भविष्यात बोगस आरोपी निर्दोष सुटले असते. त्यामुळेच दिलीप जाधव यांच्यासारख्यांना आरोपी केले आहे. या खुनाला पाठबळ असल्याने सतेज पाटील, जाधव यांनी स्वत:हून नार्को टेस्ट करून घेण्याची तयारी दाखवावी. पण ते त्यासाठी तयार होणार नसल्याने तपास यंत्रणनेने त्यांची नार्को टेस्ट करून तिचे वृत्तवाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात यावे,’’ अशी मागणी महाडिक यांनी केली.