16 December 2017

News Flash

मच्छीमारांसाठी तेल कंपन्यांना सवलतीचे आदेश; मासेमारी सुरू

मच्छीमारांना पुरविण्यात येणाऱ्या डिझेलवर पूर्वीप्रमाणेच सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी जाहीर

रत्नागिरी | Updated: February 10, 2013 2:32 AM

मच्छीमारांना पुरविण्यात येणाऱ्या डिझेलवर पूर्वीप्रमाणेच सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी जाहीर केल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. याबाबतचा पेट्रोलियम मंत्रालयाकडील आदेश आता तेल कंपन्यांकडे आलेला आहे, यामुळे मासेमारी सुरळीत सुरू झाली आहे. डिझेलचे टॅंकर यायला सुरुवात झाली आहे. अशी माहिती मच्छीमार नेते लतीफ महालदार व हसनमियाँ राजपूरकर यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
    मच्छीमारांना डिझेलवर पूर्वीप्रमाणे सवलत देण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, मच्छीमारांना डिझेल खरेदीवरची सवलत पूर्ववत करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला आहे. याबद्दल केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहे.
मच्छीमार हे त्यांच्या व्यवसायासाठी मोठय़ा प्रमाणावर डिझेल खरेदी करीत असले तरी ते इतर ठोक खरेदीदार नसून, किरकोळ खरेदीदारच आहेत. डिझेलचे दरदेखील वाढले असल्याने मच्छीमारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे, ही बाब मुख्यमंत्र्यांनी पेट्रोलियममंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. मच्छीमारांच्या मागणीसाठी मुख्यमंत्री नुकतेच दिल्ली येथे केंद्रीय पेट्रोलियममंत्र्यांना त्याचप्रमाणे काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शिष्टमंडळास भेटले होते.
मच्छीमारांसाठी देण्यात आलेल्या इंधन पंपांमधून १८ जानेवारी २०१३ पासून मच्छिमारांनी डिझेल घेणे बंद केले होते. मच्छीमार हे किरकोळ खरेदीदार असून, त्यांचा चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर ही डिझेल खरेदी केल्यामुळे त्यांना ठोक खरेदीदार म्हणणे उचित नाही, असे पेट्रोलियममंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी पेट्रोलियममंत्र्यांचे आभार मानताना म्हटले आहे की, या निर्णयामुळे मच्छीमारांना पूर्वीप्रमाणे व्यवसाय करणे सोयीचे जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना डिझेलवरील सवलतीचा लाभ मिळाल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही.

First Published on February 10, 2013 2:32 am

Web Title: order of concession to oil company for fisherman