वाई : महाबळेश्वार तालुक्यातील  व पाचगणी शहरात चक्रीवादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे जागेवर जाऊन पंचनामे करावेत, असे आदेश आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

पाचगणी परिसरात वादळी वारे आणि पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी आज पाटील यांनी केली.  यावेळी आमदार मकरंद पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, सभापती संजूबाबा गायकवाड, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौघुले, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, गटविकास अधिकारी नारायण घोलप, बेल एअरचे संचालक फादर टॉमी, तालुका आरोग्य अधिकारी अजित कदम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, प्रवीण भिलारे, जतिन जोश, महावितरणचे अधीक्षक अभियंता गायकवाड, वीज वितरणाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, किरण पवार आदी उपस्थित होते.

या वेळी नुकसानीचा आढावा घेत तातडीने नुकसानीचे  पंचनामे करण्याचे आदेश पाटील यांनी दिले. या वादळाने महाबलेश्वर आणि पाचगणी परिसरातील वीज पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाल्याने यातील अडथळ्याची पाटील यांनी माहिती घेतली.  यासाठी पाचगणी येथील महावितरणच्या कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश त्यांनी दिले.