भारतात आज हिंदू सुरक्षित नाहीत. हिंदूंचे धर्मातर होत आहे. सुरक्षित भारत, समृद्ध भारत व हिंदूंना सन्मान मिळवून देण्यासाठी विश्व हिंदू परिषद कटिबद्ध आहे. देशातील अस्पृश्यता संपवून हिंदू संघटन मजबूत बनवा, असे आवाहन करतानाच डॉ. प्रवीण तोगडिया यांनी ‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा दिला.
विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त येथे आयोजित सभेत तोगडिया बोलत होते. धर्माचे आचरण करा, जागरूक व सक्रिय हिंदू बना, असा सल्ला देतानाच अयोध्येत राममंदिराची उभारणी करून हिंदूंचा सन्मान केला जाईल, असा नारा तोगडिया यांनी या वेळी दिला. लोकसभा निवडणूक प्रचारास पोलिसांनी परभणीत येण्यास घातलेल्या प्रतिबंधाचा उल्लेख त्यांनी केला, मात्र तोगडिया यांचा आवाज परभणीत नव्हे, तर मक्का-मदिनामध्ये ऐकू येणार आहे काय, असा सवाल त्यांनी केला. हिंदूंना आपला आवाज बुलंद करण्याचा अधिकार आहे. परंतु हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदू समाज जगभर होता. हा समाज ७०० कोटी झाला असता. आता केवळ १०० कोटी हिंदू आहेत. अर्थात, ६०० कोटी हिंदूंची हत्या केली गेली, असे सांगून अरबस्तान, तुर्कस्तान, मंगोलिया, इंग्लंड यांनी भारतावर दरोडा टाकून येथील समृद्धी लुटली. भारत देश शिक्षणातील मुख्य केंद्र आहे. पूर्वी असलेली समृद्धी व ऐश्वर्य परत आणण्यासाठी हिंदूंनी एकजूट दाखवावी, असे तोगडिया म्हणाले.
लव्ह जिहादच्या नावावर हिंदूंच्या मुलीबाळींची इज्जत लुटली जात आहे, गायींची हत्या होत आहे. देशात आज हिंदू सुरक्षित नाही. हिंदूंची सुरक्षा, व्यापार, संपत्ती, शेती, मुलीबाळींची इज्जत व देशातील १०० कोटी हिंदूंना सुरक्षा कवच देण्यासाठी हिंदू परिषदेचा ५० वर्षांपूर्वी जन्म झाला. हिंदू समाजातील प्रत्येकाला जेवण, शिक्षण, आरोग्यसुविधा व नोकरी मिळाली पाहिजे, हा विश्व हिंदू परिषदेचा संकल्प आहे, असे तोगडिया म्हणाले. रामपूरकर यांनी प्रास्ताविक केले. दादा पवार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत क्षीरसागर, अनंत पांडे, जिल्हा मंत्री सुनील रामपूरकर आदींची उपस्थिती होती.