03 June 2020

News Flash

रॅडिको कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या जमिनीत स्पेंट वॉश हे रसायन टाकून प्रदूषण करणाऱ्या रॅडिको एनव्ही कंपनीने त्यांची उत्पादने बंद करावीत, असे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.

| June 26, 2015 01:30 am

शेतकऱ्यांच्या जमिनीत स्पेंट वॉश हे रसायन टाकून प्रदूषण करणाऱ्या रॅडिको एनव्ही कंपनीने त्यांची उत्पादने बंद करावीत, असे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबालंगन यांनी गुरुवारी बजावले. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी केलेले पंचनामे या आधारे प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. कंपनी बंद करताना कोणताही धोका होणार नाही, याची काळजी घेत नवीन उत्पादनासाठी लागणारे मोलॅसिस हा कच्चा माल भरला जाऊ नये आणि त्यानंतर या कंपनीची वीज खंडित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शेंद्रा परिसरातील रॅडिको एनव्ही या कंपनीने गट क्र. ३, ४, ५ ६ मधील शेतकऱ्यांच्या शेतात विषारी रसायने सोडली होती. त्यामुळे शेतीचे पूर्ण नुकसान झाले होते. या बाबत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर तहसीलदारांनी त्याचा पंचनामा केला होता. मात्र, कंपनीला नोटीस देण्याबाबत महसूल विभाग टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले होते. औरंगाबादच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर ५ जूनला त्यांनी पंचनामा केला. मात्र, १८ दिवस कंपनीला साधी नोटीसही दिली नव्हती. मात्र, केलेल्या कारवाईचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आला.
दरम्यान, मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही पंचनामे केले होते. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार धोकादायक रसायन पसरून अपाय होईल, अशी स्थिती निर्माण केल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कलम २६ अन्वये व २१ कलमाचा भंग  झाल्याने ३३(ए) या कायद्यान्वये कंपनी बंद करण्याचे आदेश आज बजावण्यात आले. या अनुषंगाने घेण्यात आलेल्या सुनावणीत तक्रारदारांनी रासायनिक विषारी द्रव्ये व रंगीत पाणी सोडल्याचा जबाब नोंदवला. केलेल्या चौकशीतही नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्याने रॅडिको एनव्ही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2015 1:30 am

Web Title: order to close production to radico company
Next Stories
1 ‘अजित पवारांशी संबंधित डेअरीकडून बारामतीमध्ये दूध उत्पादकांना कमी दर’
2 गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये जि.प. शाळांची दमछाक!
3 शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा गडकिल्ल्यांना संजीवनी द्या -राज ठाकरे
Just Now!
X