जालना जिल्हय़ामधील मंठा व परतूर तालुक्यांतील रेशन दुकानांवर राजकीय आकसातून कारवाई करण्यास पालकमंत्री तथा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी भाग पाडले, असा आरोप करीत दाखल झालेल्या याचिकेत लोणीकर यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी नोटीस बजावण्याचे आदेश दिले. जालना जिल्हय़ातील २० दुकानांवर केलेली कारवाई चुकीची असून, मंत्रिपदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप ठेवण्यात आला.
जालन्यातील रेशन दुकानांवर राजकीय आकसातून कारवाई केल्याचा आरोप करीत पाच दुकानदारांनी खंडपीठात याचिका दाखल केली. विधानसभा निवडणुकीत विरोधात प्रचार केल्याचा राग धरून पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांना सांगून पालकमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले. कारवाई आदेशाची लेखी प्रतही उपलब्ध असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. या अनुषंगाने म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे काम पाहात आहेत.